Sharad Pawar- Ramesh Chennithala Sarkarnama
मुंबई

Maharashtra Band : शरद पवारांच्या बंद मागे घेण्याच्या आवाहनावर काँग्रेसची प्रतिक्रिया; चेन्निथला म्हणाले...

Vijaykumar Dudhale

Nagpur, 23 August : उद्याचा महाराष्ट्र बंद उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने ट्विट करत बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यावरून महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

रमेश चेन्निथला (RameshChennithala) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे नागपूरमध्ये असून त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना आमची चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची सूचना मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे.

रमेश चेन्निथला म्हणाले, न्यायालय आणि न्यायालयाचा आदेश मानणारे आम्ही लोक आहोत. मात्र, बदलापूरमधील घटनेवरून जनतेत सर्वाधिक रोष आहे. तो कसा व्यक्त करायचा, हे चर्चा करून ठरविणार आहोत. मी आणि वडेट्टीवार नागपूरमध्ये आहोत. ठाण्यात नाना पटोले (Nana Patole) आहेत. नगर बाळासाहेब थोरात आहेत, तर मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड ह्या मुंबईत आहेत. या सर्वांच्या संपर्कात आम्ही आहोत.

न्यायालयाचा आदेश तीन वाजता आला आहे. त्यावर आता काय करायचं, यावर चर्चा सुरू आहे, त्यामुळे नाना पटोले हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत आहेत. त्या चर्चेनंतर बंदबाबतचा निर्णय घेणार आहोत, असे रमेश चेन्निथला यांनी सांगितले.

शरद पवारांनी काय ट्विट केले आहे?

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. २४ ऑगस्ट) राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.

हा बंद भारतीय राज्य घटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येते, असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT