Mumbai, 10 July : विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार नमिता मुंदडा यांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे, खाटाची संख्या आणि कॅन्सर युनीटबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच सुविधा मिळतील, असे स्पष्ट केले. मात्र, मुंदडांनी टॉईमबॉण्डची मागणी केली, त्यावर अर्थमंत्रीच आता अंबाजोगाई-बीडचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे छप्पर फाडके मिळेल, असे जाहीरपणे विधानसभेत सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमिता मुंदडा यांच्या मतदारसंघातील अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयासाठी दिवाळीपर्यंत किंवा डिसेंबपर्यंत सर्व सुविधा मिळतील, असे जाहीर करून आमदार मुंदडा यांना गुड न्यूज दिली.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची पदे अद्याप मंजूर करण्यात आली नाहीत. ती कधीपर्यंत मंजूर होतील, तसेच, खाटांची संख्या कधी वाढविणार तसेच याच हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं युनीट होतं, ते बंद आहे. ते युनीट प्राधान्याने सुरू करण्यात यावे. अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ३५ कोटींच्या अंदाजपत्रकास सरकार कधी मंजुरी देणार, वैद्यकीय महाविद्यालच्या वसतिगृहाच्या काम प्रलंबित आहे, ते कधी सुरू होणार, असे प्रश्न आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारले.
त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लवकरात लवकर भरती करण्यात येईल. सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन्ही वर्षांत १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देऊन लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. त्यात २८८ खाटांची दुरुस्ती, वसतिगृह, धर्मशाळा इमारतीचे बांधकाम, मुलींचे वसतिगृह, डांबरी रस्ता, नालाबांधकाम, वॉटर प्लॅंट ही व इतर काम करण्यात येणार आहेत.
अंबाजोगाईमध्ये जीएनएम नर्सिंग कॉलेज आहे, त्याचे रुपांतर बीएसस्सी नर्सिंंगमध्ये लवकरात लवकर करण्यात येणार आहे. तसेच, कॅन्सर युनीटच्या संदर्भात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आपण कॅन्सर एल वन, एल टू, आणि एल थ्री हे धोरण आम्ही आणत आहोत. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात पहिलं कॅन्सरचं युनीट तयार करण्यात येईल. सुपरस्पेशालिटीप्रमाणे अत्याधुनिक सुविधा वर्षभरात या वैद्यकीय रुग्णालयात मिळतील.
हसन मश्रीफांंनी कॅन्सरचे युनीट लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले, त्याबाबत धन्यवाद. पण, गेली दोन ते तीन वर्षांपासून हे प्रश्न मी मांडत आहे. लवकरच सुरू करण्यात येईल, असं उत्तर देण्यात येतं. पण, याबाबत मंत्र्यांनी टाईमबॉण्ड म्हणजे चार ते सहा महिने असे उत्तर द्यावं, असे आवाहन नमिता मुंदडा यांनी केले.
नमिता मुंदडा यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधा करण्याबाबत टाईमबॉण्डची मागणी करताच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, मुंदडाताई आता घाबरण्याची गरज नाही. अर्थमंत्रीच आता अंबाजागेाई आणि बीडचे पालकमंत्री असल्यामुळे छप्पर फाडकेच मिळणार...एका वर्षाच्या आतमध्ये सगळ्या सुविधा होतील, असे उत्तर दिले.
हसन मश्रीफांच्या उत्तरानंतर खुद्द उपुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात या सर्व सुविधा दिवाळीपर्यंत किंवा जास्तीत जास्त डिसेंबरपर्यंत दिल्या जातील. वेळ पडली तर विशेष बाब म्हणून अधिक देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, नमिता मुंदडा यांची ही मागणी पूर्ण करण्यात येईल, असे सांगून अजितदादांनी नमिता मुंदडा यांना विधानसभेत गुड न्यूज दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.