डोंबिवली : राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे दावे ठोकले जात आहेत, पण दुसरीकडे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मात्र कुरघोडीचं राजकारण असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये कुरबुरी सुरूच असल्याचे दिसून येतंय.
त्यात भर म्हणजे मनसेनेही भाजप -शिंदे गटाची डोकेदुखी वाढवली आहे. यातच आता उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात लक्ष घातले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात सुरुवातीला येऊन त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, शशिकांत कांबळे, अभिमन्यू गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड (Ganpatrao Gaikwad) यांच्या नातीची भेट घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खास करून कल्याणमध्ये आले होते. गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांची नुकतीच राजकारणात एन्ट्री झाली आहे. कल्याण लोकसभेतील युवा नेतृत्व म्हणून वैभव यांच्याकडे पाहिले जात असतानाच, उपमुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या कन्येला भेटण्यासाठी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळात वेळ काढून आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
या वेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांना काही प्रतिक्रिया देणे टाळले असले तरी भाजप पदाधिकाऱ्यांनी मात्र त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली आहे. पोलिस प्रशासनाकडून भाजप कार्यकर्त्याबाबत दुजाभाव केला जात आहे. आमच्यावर अन्याय होत असून, याकडे लक्ष द्यावे अशी विनंती त्यांनी केली आहे.
या वेळी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र यांनी भाजप कार्यकर्त्यांबाबत पोलिसांकडून दुजाभाव केला जात असल्याचे गाऱ्हाणे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर मांडले. याविषयी सूर्यवंशी म्हणाले, कल्याणच्या वडवली भागात भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला असून, या प्रकरणी पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार दाखल आहे.
मात्र, त्यानंतरही पोलिस आरोपीला अटक करत नाही. तसेच पोलिस प्रशासन भाजप कार्यकर्त्यांबाबत दुजाभाव करत असल्याचे आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यावर फडणवीस यांनी आपण या प्रकरणी लक्ष घालू, असे आश्वासित केल्याचेही सूर्यवंशी यांनी या वेळी सांगितले. सत्ताधारी पक्षातील असूनही आमच्यावर अन्याय होत आहे, असेदेखील सूर्यवंशी यांनी प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले.
विकासकामांबाबतदेखील प्रशासन भाजपचे माजी नगरसेवक लोकप्रतिनिधींना डावलत असल्याचेदेखील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. या भेटीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांचा रोख सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडे होता. एकंदरीतच कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट (Shivsena ) व भाजपमधील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत भाजप व शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटला असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आज पुन्हा एकदा भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तेत असूनही भाजपसोबत दुजाभाव केला जात असल्याची व्यथा फडणवीस यांच्यासमोर मांडली.
दरम्यान, फडणवीस राजकारणात नव्याने एन्ट्री झालेले वैभव गायकवाड यांच्या मुलीला भेटण्यासाठी वेळात वेळ काढून कल्याण मध्ये आल्याने गायकवाड आणि फडणवीस यांच्या सलोख्याच्या वेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. युवा नेतृत्व म्हणून वैभव यांच्याकडे पाहिले जात असतानाच त्यांच्यावर लवकरच पक्ष मोठी जबाबदारी सोपवणार का ? याची ही चर्चा सुरू झाली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.