Ganpat Gaikwad, Mahesh Gaikwad Sarkarnama
मुंबई

Ganpat Gaikwad Firing : खुनाच्या हेतूनेच गायकवाडांकडून गोळीबार ; अतिरिक्त पोलिस आयुक्तांची माहिती

Bhagyashree Pradhan

Kalyan Dombivli News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड व इतरांवर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार हा स्वसंरक्षणार्थ नसून खुनाच्या हेतूने केल्याची खळबळजनक माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी आज सकाळी दिली आहे. त्यांच्या विधानामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

काल रात्री उल्हासनगर येथे भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात मोठा राडा झाला. भाजप आमदार गायकवाडांनी शिंदे गटाच्या कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड याच्यावर वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबिनमध्येच गोळीबार केला. हिल लाईन पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. दरम्यान, आमदार गणपत गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या कारणावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती. त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर गोळीबाराची घटना घडली. याबाबत अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी सकाळी पत्रकारांना माहिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार गायकवाड यांनी शांत डोक्याने खुनाचा प्रयत्न केला असून त्यांच्या विरोधात (कलम 307, 120(ब), 34, 143, 147, 148, 149 सहकलम 30 अंतर्गत) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारली गावातील एका जमिनीवरून वाद सुरू होते. ही जमीन एकनाथ जाधव या कुटुंबाची आहे. हे जुनेच वाद होते त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली.

महेश गायकवाड आणि इतरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार आली होती. त्या तक्रारीमुळे दोन्ही गट पोलीस ठाण्यात आले होते. दरम्यान, आमदार गणपत गायकवाड तिथे आले. महेश गायकवाड, राहुल पाटील आणि फिर्यादी शैलू जाधव हे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये बसले होते. याचवेळी आमदार गायकवाड यांनी अचानकपणे उठून गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले.

आत्तापर्यंत सहा गोळ्या जखमींच्या शरीरातून काढल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत आमदार गायकवाड, हर्षल केने, संदीप सरवणकर अशा तिघांना अटक केल्याची माहिती शिंदे यांनी दिली. आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला कोणतीही मारहाण झालेली नाही. आमदार गायकवाड यांनी आत्मसंरक्षणासाठी नाही तर हेतुपुरस्सर हल्ला केला असेही शिंदे यांनी सांगितले.

आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आधीच पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनतर महेश गायकवाड आले आणि नंतर आमदार आले. या दोन्ही गटांचे लोक पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे होते. आरडाओरड सुरू झाला होता. तो गोंधळ नियंत्रित करण्यासाठी हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप बाहेर आले.

दरम्यान, कोणालाही बाहेर मारहाण झालेली नाही. मात्र त्याचवेळी गणपत गायकवाड यांनी केबिनमध्ये उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. गोळ्या त्याच्या छातीत आणि इतर भागात लागल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप त्यांच्या केबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या डिस्प्लेकडे पाहून बाहेरची परिस्थिती काय आहे याचा अंदाज घेत होते.

जखमींकडून कोणतीही चिथावणी झालेली दिसत नाही. आमदार गायकवाड यांनी शांतपणे ठरवून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे, असेही आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT