Mumbai, 01 March : राज्यसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडीत सध्या जोरदार धुमशान सुरू आहे. आघाडीकडील आमदारांची संख्या लक्षात घेता तीन पक्षांचे मिळून एकच खासदार निवडून येऊ शकतो. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह तीनही पक्षाचे खासदार राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. शिवसेना आणि काँग्रेस राज्यसभेसाठी प्रचंड आग्रही आहेत. दुसरीकडे, पवारांचे नावही चर्चेत आहे, त्यामुळे महाआघाडीत मोठा पेच उभा राहिला आहे. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तोडगा सुचविला आहे, तसा प्रस्ताव त्यांनी मित्रपक्षांना दिल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील सात खासदार राज्यसभेतून (Rajya Sabha) निवृत्त झाले आहेत. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, फौजिया खान हे राष्ट्रवादीचे, तर रजनी पाटील ह्या काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा ५ मार्च हा शेवटचा दिवस आहे. मात्र, महाविकास आघाडीत अजूनही ही निवडणूक कोणी लढवायची, यावर एकमत होऊ शकलेले नाही.
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस (१६), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (१०) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (२०) या तीन पक्षांचे संख्याबळ पाहता त्यातून केवळ एकच उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यामुळे राज्यसभेवर कोणी जायचे आहे. यावरून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जोरदार वाद रंगला आहे.
शिवसेना आणि काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. आमच्या पक्षाचे खासदार निवृत्त झाले आहेत, त्यामुळे आम्हाला संधी मिळावी, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. मोठं नाव आलं तर आमची संधी जाऊ शकते, अशी भीतीही ठाकरे सेनेच्या युवा आमदाराने बोलून दाखवली होती. मात्र, खासदार संजय राऊत यांनी ‘शरद पवार यांनीच राज्यसभेत जावे’ असा आग्रह धरला आहे.
ठाकरेसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही राज्यसभेच्या एकमेव जागेवर आपला दावा सांगितला आहे. आता आमची वेळ असून आम्हाला राज्यसभेची जागा मिळावी, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही तशीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीपुढे राज्यसभेचा उमेदवारी मोठा पेच उभा राहिला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील राज्यसभेच्या उमेदवारीच्या पेचावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक तोडगा सुचविला आहे. राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, अशी आमची मागणी आहे. ठाकरेसेना २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे १० जागा आहेत. उद्धव ठाकरेंनी आगामी काळात विधान परिषदेत जावं आणि राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी, असा प्रस्ताव आम्ही मित्रपक्षांना दिलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.