Kirit Somaiya Sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya : सारेच भ्रष्टाचारी विरोधी पक्षांत..! किरीट सोमय्यांचा अजब फंडा...

अय्यूब कादरी

Mumbai Political News : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा 'वसा' घेतला आहे, मात्र तो निवडक श्रेणीतील आहे. त्यांना सर्व भ्रष्टाचारी नेते विरोधी पक्षांमध्येच दिसतात. त्यांच्या पक्षात आलेल्या किंवा त्यांच्या मित्रपक्षांमधील भ्रष्टाचारी त्यांना दिसत नाहीत. त्यांनी भ्रष्टाचारी म्हणून आरोप केलेले नेते त्यांच्या पक्षामध्ये आले की तेही शुद्ध होतात, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मध्यंतरी सोमय्या यांचे कथित आक्षेपार्ह अवस्थेतीतल व्हिडीओ एका दूरचित्रवाहिनीने प्रसारित केले होते. त्या संकटातून 'तावून सुलाखून' निघालेल्या सोमय्या यांनी आपली 'मोहीम' पुन्हा सुरू केली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांना गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने दणका दिला होता. दापोली येथील साई रिसॉर्टचे पाडकाम करण्याची कारवाई केली जाणार होती. याबाबतही सोमय्या यांनीच तक्रार केली होती. हा रिसॉर्ट शिवसेना (ठाकरे गट) नेते, माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मालकीचा असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. परब यांनी याचा इन्कार केला होता. हे रिसॉर्ट आपल्या मालकीचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

आपल्याला त्रास देण्यासाठी सोमय्या यांनी हे कारस्थान रचल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हिम्मत असेल तर त्यांनी शिंदे गटात गेलेल्या नेत्यांविरुद्ध बोलून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले होते. अर्थातच सोमय्या यांन ते स्वीकारले नाही. उलट, काही नेत्यांवर ईडीने सुरू केलेली कारवाई ते शिंदे गटात जाऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर थंडबस्त्यात गेली.

खेड न्यायालयाने साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ते पाडले जाणार होते. त्या कारवाईला स्थगिती देत उच्च न्यायालयाने सोमय्यांना धक्का दिला होता. पाडकामाची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार होती. आता जिल्हा न्यायालयाने १ डिसेंबर २०२३ पर्यंत पाडकाम करू नये असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, ईडीने अनिल परब यांचे व्यासायिक भागीदार सदानंद कदम यांना यंदा मार्चमध्ये ताब्यात घेतले. हे रिसॉर्ट पाडले जाणार की नाही, हे एक डिसेंबर रोजी स्पष्ट होईल. तोपर्यंत वरच्या न्यायालयात जाण्याची संधी मिळाली आहे. या रिसॉर्टच्या बांधकामासाठी अकृषी प्रमाणपत्र बेकायदेशीरपणे घेण्यात आले, त्यासाठी मनी लाँड्रिंग करण्यात आली, असे आरोप सोमय्या यांनी केले होते.

'कोणाचे किती अनधिकृत बांधकाम आहे, याची यादी आमच्याकडे आहे. आमची वेळ आली की आम्ही नावे बाहेर काढू,' असा इशारा परब यांनी दिला होता. परब यांची वेळ अजून आलेली नाही, म्हणजे त्यांची सत्ता आलेली नाही. सत्ता येईल तेव्हा ते नावे उघड करतील, अशी अपेक्षा आहे.

'सोमय्यांनी हिम्मत असेल तर त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि सोलापूरचे (दक्षिण) आमदार सुभाष देशमुख यांच्या घरांवरही हातोडा मारावा,' असे आव्हान परब यांनी दिले होते. आमदार सुभाष देशमुख यांनी जुळे सलापुरात प्रशस्त घर बांधले आहे. ती जागा महापालिकेच्या मालकीची आहे, असा आरोप काही वर्षांपूर्वी झाला होता. त्याची काही दिवस चर्चा झाली. नंतर ते प्रकरण शांत झाले.

विरोधकांना भीती दाखवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडीचा वापर केला जात आहे, असा आरोप सातत्याने केला जात आहे. ईडीने कारवाई सुरू केली आणि संबंधित नेते भाजपसोबत गेले की ती कारवाई थांबल्याची अनेक उदाहरणे आहेत. 'भाजपमध्ये आल्यापासून मला आता शांत झोप लागते,' असे वक्तव्य माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. हे वक्तव्य विरोधकांच्या दाव्याला पुष्टी देणारेच आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये सोमय्या यांना एकही नेता भ्रष्टाचारी दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमय्या हेही काचेच्या घरातच राहतात, याची प्रचीती त्यांचे आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर आली होती.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT