Mumbai News : नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी अनेकांची उमेदवारी कापावी लागली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या मंडळींची संख्या मोठी होती. मात्र, त्यापैकी शेवटच्या क्षणी वडाळा येथील प्रभाग क्रमांक 178 मधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आलेल्या माधुरी विश्वासराव-मांजरेकर या उमेदवारी कापल्यानंतर सर्वांसमोरच ढसाढसा रडलेल्या होत्या.पण दीड महिन्यातच उद्धव ठाकरेंकडून त्यांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. त्यामुळे त्या भावुक झाल्या होत्या. त्यांची आता मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागलेली आहे. त्यानंतर माधुरी यांनी 'निष्ठेचं फळ' अशी एका वाक्यातच प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेच्या वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवक पद येत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी यासाठी त्यांच्या पक्षातील तीन जणांच्या नावावर स्वीकृत नगरसेवक म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी यादी होती. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक ही तीन नावे फायनल करण्यात आली आहेत. 21 फेब्रुवारी रोजी या स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांच्यामार्फत 21 तारखेला औपचारिक घोषणा होईल. त्यानंतर साईनाथ दुर्गे, माधुरी विश्वासराव - मांजरेकर, कैलास पाठक यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होईल. या तिन्ही नावांवर मातोश्री बंगल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
'निष्ठेचं फळ मिळाले'
निष्ठा आणि त्याचं फळ हे मातोश्रीने दाखवून दिलेलं आहे. सभागृहात शिवसेनेचा आवाज बुलंद ठेवण्यास मी कटिबद्ध राहीन व मातोश्रीच्या मोठ्या मनाबद्दल मला बरंच काही बोलायचं आहे. स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागल्यानंतर माधुरी विश्वासराव-मांजरेकर यांची ही बोलकी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे.
मी 35 वर्ष संघटनेसाठी काम केले, 2017 मध्येही तिकीट वाटपात माझा बळी गेला होता, आत्ताही माझा बळी गेला, माझे कुठे चुकलं हे मला सांगावं, शिवसेनेसाठी मी आयुष्य घालवलं आहे, अशा शब्दात मुंबई महापालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या तोंडावर तिकीट नाकारल्याने माधुरी मांजरेकर ढसाढसा रडत म्हणाल्या होत्या. मात्र जेमतेम दीड-दोन महिन्यातच चित्र पालटले आहे. त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी आता मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.