

माळशिरसमध्ये मोहिते पाटलांना वगळून राजकारण? कधीकाळीपर्यंत हा विचार काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो की भाजप असो... कोणत्याही पक्षाला शक्य नव्हता. पण भाजपने आता हा फक्त विचार नाही केलेला तर तशी कृतीही करायला सुरुवात केलीय. त्यातूनच सत्तेच्या जवळ जाण्यासाठी मोहिते पाटील आता शिवसेनेचा आधार शोधत आहेत. तो कसा? आणि का? हेच आपण समजून घेणार आहोत.
माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीच्या राजकीय टायमिंगची सध्या सोलापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाची बलाढ्य सत्ता, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मिळवलेले यश, निधीसंदर्भात गोरे यांनी केलेली काही विधान यानंतर मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
माढा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामांबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे जाऊन भेट घेतली, असे या भेटीमागचे कारण मोहिते पाटील यांनी सांगितले आहे. पण राजकारणात कधीच कोणती भेट केवळ एका कारणासाठी नसते आणि ती अराजकीय तर आजिबातच नसते. आता जर सोलापूरमधील विशेषतः माढा लोकसभा मतदासंघातील राजकारण बघितलं तर इथे धैर्यशील मोहिते पाटील खासदार आहेत. पण त्यांचा पक्ष सत्तेत नाही, सत्तेत भाजप आहे.
लोकसभेला मोहिते पाटील कुटुंबाने बंडखोरी केल्यानंतरच भाजपमध्ये त्यांच्याबाबत मोठा उद्रेक बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तेव्हापासूनच मोहिते पाटील घराणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात गेले. भाजपच्या वळचणीला आलेले एखादे राजकीय घराणे पुन्हा पक्षातून बाहेर पडण्याची ती कदाचित पहिलीच वेळ होती.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांचे बंधू रणजीतसिंह मोहिते पाटील हेही भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देतील अशी त्यावेळी शक्यता होती. पण रणजीतसिंह यांनी अजूनपर्यंत आमदारकी सोडलेली नाही. एकदा ऑफ द रेकॉर्ड चर्चेत एक नेत्याने "आम्ही त्यांना पक्षाच्या कोट्यातून आमदारकी दिली होती, म्हणजे अगदी फुकट" अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यातच विधानसभेला राम सातपुते यांचा पराभव झाला आणि उत्तम जानकर निवडून आले.
या निवडणुकीत रणजितसिंह मोहित पाटील यांनी भाजपविरोधी काम केल्याचा आरोप करत राम सातपुते यांनी रान उठवलं होतं. तेव्हापासूनच माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांना वगळून राजकारण करू निर्णय भाजपमध्ये घेण्यात आला. त्यानंतर राम सातपुते यांना ताकद देण्यास सुरुवात झाली. आता माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भाजपने राम सातुपते यांच्या नेतृत्वात लढवल्या. नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या काही जागा निवडून आल्या, जिल्हा परिषदेला राम सातुपते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी झाल्या.
अजितदादांच्या निधनाने बदलली समीकरणे :
तत्पूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झाली होती. त्यादृष्टीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या वेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात होती. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या अजितदादांचा पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना विकास निधीसाठी आधार होता. पण दादांच्या अपघातील मृत्यूमुळे सगळी समीकरणेच बदलली आहेत.
निधीसाठी भाजपकडून अडवणूक होऊ शकते...
लोकसभा निवडणुकीपासून धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिका, जिल्हा परिषदेत निवडणुकीतही भाजप विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकमेकांना इशारे-प्रतिइशारे दिले आहेत. पालकमंत्री गोरे यांनीही निधीसाठी भाजपकडेच यावे लागणार आहे, अशा आशयाची विधाने केली आहेत. त्यामुळे आगामी काळात मोहिते पाटील आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदेंनी भेट घेणे, विशेष मानले जात आहे. विकास कामांमध्ये भाजपकडून होणारी संभाव्य कोंडी लक्षात घेऊन मोहिते पाटील यांनी शिंदेंकडे पर्यायी व्यवस्था केली ही काय, अशीही चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पक्षासोबत विशेषतः पालकमंत्री गोरेंशी वाढत जाणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीचे साधलेले टायमिंग विशेष मानले जात आहे. सोलापूरमध्ये शिवसेनेचीही ताकद मोठी हे लक्षात घ्यावे लागते.
रणजीतसिंह मोहिते पाटील यांची आमदारकी :
रणजीतसिंह मोहिते पाटील यांची आमदारकीची मुदत मे महिन्यात संपत आहे. भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवलं जाणार नाही, हे तर निश्चित आहे. आता त्यांच्या ऐवजी राम सातपुते यांना संधी मिळू शकते. अशावेळी सत्तेचा पक्ष आपल्या सोबत असावा असा विचार करूनही मोहिते पाटील यांनी शिवसेनेचा आधार शोधायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. आमदार उत्तम जानकर यांनीही शिवसेनेचे मंत्री उदय सावंत आणि भरत गोगावले यांची भेट घेतल्याचे फोटोही समोर आले होते.
मोहिते पाटलांची सगळी शक्ति स्थळ उद्ध्वस्त :
जे सुपडा साफ करायची वल्गना करत होते त्यांचा सुपडा भाजपने साफ केला. ते कुठेही गेले तरी हाताला फार काही लागण्यासारखे नाही. मात्र, हा आधार शोधण्याचा शेवटचा प्रयत्न असू शकतो. भाजपने इथली त्यांची सर्व शक्तीस्थळे उद्ध्वस्त केली आहेत, त्यांना जो न्यूनगंड होता की आम्ही म्हणजेच जिल्हा, आम्ही म्हणजेच जिल्हा परिषद आणि आम्ही म्हणजेच महापालिका. आम्ही काही करू शकतो ही त्यांची धारणा धुळीला मिळविली आहे, असा सणसणीत टोला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.