Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : मध्यावधी निवडणूक झाली तर उद्धव ठाकरेंना फायदा होईल का ?

Mangesh Mahale

Uddhav Thackeray News : राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसापूर्वी म्हटलं आहे. तर दुसरीकडे नुकतीच शिवसेनेने वंचित विकास आघाडीशी युती केली आहे. (Maharashtra Politics news update)

शिवसेना आणि 'वंचित'यांची युती झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मध्यावधी निवडणुकीचे आव्हान केले आहे. या पार्श्वभूमीवर मध्यावधी निवडणुका झाल्या तर शिवसेना फायदा होईल का, हे जाणून घेऊन या.

शिंदे गटाची इमेज डॅमेज करण्यासाठी..

शिवसेनेची वंचितची युती झाली असली तरी, कुणाला किती जागा मिळतील, महाविकास आघाडी पक्षात वंचितचे काय स्थान असेल, याबाबत अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. राज्यात सत्तातर झाल्यानंतर समाज माध्यमांमधून उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ चर्चा होताना दिसतेय. 'गद्दार','खोके सरकार', 'पाठीत खंजीर खुपसला,' अशी टीका शिंदे गटावर होत असताना शिंदे गटाची इमेज डॅमेज करण्याची काळजी ठाकरे गट घेताना दिसत आहे.

एकट्याच्या हिंमतीवर लढाई..

जर राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्यात तर शिवसेनेला फायदा होईल की तोटा हे समजून घेण्यापूर्वी गेल्या सहा महिन्यात राज्यातील घडामोडी जाणून घेणे गरजेचे आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्ष नाव गेलं, चिन्ह गेलं आता उद्धव ठाकरे यांना एकट्याच्या हिंमतीवर पुढील लढा देणे हे शिवसेने समोर आव्हान आहे.

ठाकरेंच्या मागे सहानुभूती

सध्याच्या काळात मध्यावधी निवडणुका होण्याचा फायदा हा उद्धव ठाकरेंनाच होऊ शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. उद्धव ठाकरेंसोबत दगाबाजी झाली, खोक्यांचे प्रयोग झाले. त्यामुळे त्यांच्या मागे सहानुभूती आहे, असं बोललं जातं आहे आणि असं चित्र उभं करण्यात शिवसेनेला यश मिळत असल्याचे दिसते.

सभा गाजविणारे नेते कोण?

याचा निश्चितच फायदा शिवसेनेला होईल पण त्यासोबत मध्यावधी निवडणुकीचा सामना देखील उद्धव ठाकरेंना करावा लागेल. पण गेल्या निवडणुकीत सभा गाजविणारे अनेक नेते शिंदे गटात गेल्याने त्यांची जागा संजय राऊत, सुषमा अंधारे वगळता कोण घेणार, हा प्रश्न ठाकरे गटासमोर आहे.

पुरेशी आर्थिक मदत..

मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक असल्याने पुरेशी आर्थिक मदत आगामी निवडणुकीत शिवसेनेला मिळणार नाही, सहानुभूतीच्या जोरावर उद्धव ठाकरे कमबॅक करतील, असं बोललं जात असलं तरी तरी सध्या असलेले १६ आमदारांना टिकवणे, ही संख्या ५० च्या वर नेणं हे अवघड आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. लगेचच निवडणुका झाल्या तर सहानुभूतीच्या वातावरणात फायदा ठाकरेंना होणार असला तरी, त्यांच्या मर्यादा देखील आहेत.

सहानुभूती प्रत्यक्ष मतांमध्ये दिसेल का ?

उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम, मराठी विरुद्ध अमराठीचा मुद्दा, मुंबई गुजरातमध्ये जाणार का? असं चित्र निर्माण करणं, मुंबईचं व्यापारी केंद्र गुजरातला हलवल, बुलेट ट्रेन असे अनेक मुद्दे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडे आहेत. सहानुभूती प्रत्यक्ष मतांमध्ये दिसेल का हे निकलातच कळू शकेल. उद्धव ठाकरे यांना या परिस्थितीचा राजकीय फायदा करून घेण्यात यश येईल का? यासाठी निकालाची वाट पहावी लागेल.

'वंचित'शी युतीचा फायदा होईल का?

उद्धव ठाकरेंनी वंचित सोबत युती झाल्यावर बंडखोर आमदारांना आणि भाजपला ओपन चॅलेंज दिलंय. "एकनाथ शिंदे आणि भाजपा मध्ये हिम्मत असेल तर असेल तर त्यांनी निवडणुका घोषित करावी," असे आव्हान उद्धव ठाकरेंनी केले आहे.शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेच्या फुटी नंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे.

मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणे होत असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूर असल्याची चित्र आहे. यामुळे आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीचा राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होतो आगामी काळात समजू शकेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT