Congress Sarkarnama
मुंबई

Maharashtra Congress : मोठी बातमी! काँग्रेस फुटीच्या मार्गावर; महिन्याभरातच राज्यात मोठा भूकंप ?

Rajyasabha Election And Congress Crisis : राज्यसभेची निवडणुकीपूर्वी आणि राहुल गांधींची न्याय यात्री मुंबईत येण्यापूर्वीच राज्यात भूकंपाची शक्यता

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : काँग्रेसची 55 वर्षांची साथ सोडून माजी मंत्री मिलिंद देवरांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाणे पसंत केले. त्यानंतर मुंबईतील काँग्रेसचे मोठे प्रस्थ असलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी आणि त्यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) अजित पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. मात्र कुंपणांवर असलेले तब्बल 15 आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याचा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याने केला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या या बातमीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुस्लिम आमदारांसह नेत्यांचा प्रवेश करवून घेत मुंबईत महायुतीची ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबईतील झिशान सिद्दीकी, अमीन पटेल आणि अस्लम शेख या काँग्रेस आमदारांना अजित पवार (Ajit Pawar) गटात घेण्याचा मानस महायुतीचा आहे. सध्या सिद्दीकी आणि शेख यांच्याविरोधात ईडी सक्रिय आहे. दरम्यान, यास सिद्दीकी पितापुत्राने नकार दिला आहे. मात्र राज्यातील तब्बल 15 काँग्रेसचे आमदार महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच हे पक्षांतर घडवून आणण्याच्या बेतात भाजप असल्याचे काँग्रेसच्या नेत्याने सांगितल्याने खळबळ उडाली.

काँग्रेसच्या नेत्याने सांगितले, 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर 20 मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी (Rahul Gandhi) न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसच्या 15 नेत्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आता पक्ष सोडू नये म्हणून काँग्रेसच्या वतीने त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांचे पक्ष सोडण्याची कारणे समजून घेतली जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या चर्चेला यश आले नाही तर महिन्याभरातच राज्यात आणखी मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसांपूर्वी जळगावमधील काँग्रेस नेते उल्हास पाटील (Ulhas Patil) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता मुंबईतील बाबा सिद्दीकीसह इतर नेत्यांनाही अजित पवार गटाच्या माध्यमातून भाजप गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावर एसआरए बांधकामातील गैरव्यवहारप्रकरणी ईडीची टांगती तलवार आहे. त्यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चांचे ठासून खंडन केले आहे. मात्र काँग्रेसच्याच ज्येष्ठ नेत्याने केलेल्या विधानामुळे महिनाभरात राज्यात काय होणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT