Shinde Group MLA Sarkarnama
मुंबई

Shinde Group MLA News : शिंदे गटाच्या आमदाराने खा खा खाल्ले अन्‌ ४० हजारांचे बिल पाहून कॅन्टिनचालकावरच भडकले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) लोकप्रियतेचा मुद्दा चर्चेत असतानाच, त्यांच्या एका आमदाराने आमदार निवासातील कॅन्टिनमधील जेवणाचे ४० हजार रुपयांचे बिल थकवून आपले नाव घालवले आहे. आमदार, त्याच्या कार्यकर्त्यांनी दोन-सव्वादोन महिने कॅन्टिनमध्ये खा-खा खाल्ले आणि ४० हजार रुपयांचे बिल येताच आमदाराने हात वर केले. बिल भरत नसल्याचे पाहून कॅन्टिनमालकाने उधारी बंद करून आमदारसाहेबांचे उधारीवरचे जेवण थांबवले आहे. त्यानंतरही आमदार आणि त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांकडून ‘ऑर्डर’ सुरूच राहिल्याने कॅन्टिनमालक आणि मॅनेजर वैतागले आहेत. (MLA from Shinde group kept canteen driver's bill of Rs 40,000 in arrears)

आमदार (MLA), स्वीय सहायकाला (पीए) रोज-रोज बोलूनही आमदार बिल भरायचे नावच घेत नसल्याचे कॅन्टिनवाले उघडपणे सांगत आहेत. या आमदाराने कॅन्टिनमालकाला जेवणाच्या बिलावरून नाकीनऊ आणल्याची चर्चा जोरात रंगली आहे.

जेवणाचे बिल थकविणारे हे आमदारसाहेब तसे मुंबईबाहेरचे आहेत. ते शिवसेनेचे (Shivsena) सिनिअर आमदार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ते जवळचे असून, मंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे नाव असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांप्रमाणेच (नव्या पाहणीनुसार) हे आमदारही त्यांच्या मतदारसंघात लोकप्रिय असल्याचे दाखले दिले जातात. त्यामुळे मुंबईत त्यांच्या दरबारात समर्थकांची मोठी ऊठबस असते.

हे आमदारसाहेब समर्थकांसोबत सरकारी कॅन्टीनमधील साधे जेवण करतात. त्यासाठी त्यांनी आमदार निवासमधील कॅन्टीनमध्ये उधारी लावली आहे. आमदारसाहेबांचे पाहुणे रोज नाश्त्यापासून रात्री कॅन्टीनमध्ये जाऊन ताव मारतात. जेवणाचे बिल येताच पाहुणे, कार्यकर्ते थेट आमदाराचे नाव सांगून निघून जातात. अशा बिलांची रक्कम आता ४० हजारांत गेली आहे.

कॅन्टीनच्या मॅनेजरने आधी पीए आणि त्यानंतर आमदारांना फोन करून बिल मागितले. त्यावर 'करतो' असे उत्तर आले, त्यानंतरही जेवणावळी सुरूच राहिल्या. उधारीचा आकडा ५० हजारांत जाईल आणि तो वसूल होणार नाही, या भीतीने कॅन्टीनमालकानेच पैशांचा तगादा लावला. त्यावरून आमदारसाहेब चांगलेच भडकले आणि ‘एवढे बिल कसे’? असा प्रश्न कॅन्टीनमालकाच विचारला. त्यावरून सावध झालेल्या कॅन्टीन मॅनेजरने शेवटी उधारीवर जेवण देणार नसल्याचे आमदाराला इतरांकडून कळविले.

आमदारापेक्षा नेहमीच चार पावले पुढे जाणाऱ्या खासगी ‘पीए’ने पुन्हा कॅन्टीनमध्ये जेवणाची 'ऑर्डर' दिलीच. पण, तुमचे जेवण बंद आहे. आधी पैसे द्या मगच जेवण, असे मॅनेजरने पीएला आधी प्रेमाने त्यानंतर खडसावून सांगितले. त्यानंतर मात्र पीएने आधी पैसे मोजले आणि जेवण घेतले. तसा हा ‘पीए’ आमदारसाहेबांना सांभाळून घेतो. या पीएमुळे तरी आमदारसाहेबांना एका दिवसापुरते रात्रीचे जेवण मिळाले.

एका सर्व्हेत मुख्यमंत्री शिंदे हे फडणवीसांना मागे टाकून पुढे गेल्याचे आकडे सांगतात. मात्र, ‘बिल थकविणारे’ आमदार हे स्वत:सह मुख्यमंत्र्यांचेही नाव घालवत आहेत, असे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT