Arvind Sawant sarkarnama
मुंबई

Mumbai South LokSabha Constituency : अरविंद सावंतांना हॅटट्रिकची संधी, पण जागावाटपाचा तिढा अडसर

Mumbai Political News : अरविंद सावंतांनी 2014 आणि 2019 मध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 2019 च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता.

Anand Surwase

Lok Sabha Election 2024 : शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ नेते आणि एक कट्टर शिवसैनिक म्हणून अरविंद सावंत यांना ओळखले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार कोणताही विचार न करता अरविंद सावंत यांनी केंद्रीयमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडून शिंदे गटाने पक्षावर दावा सांगितल्यानंतरही अरविंद सावंत यांनी मूळ शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. भाजप हा शिवसेनेच्या मेहेरबानीवर उभा झालेला पक्ष आहे, असा थेट निशाणा साधण्याची धमक या नेत्यामध्ये आहे. त्यामुळेच आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने अरविंद सावंत यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक नेते आणि पक्षाचे प्रवक्ते म्हणून अरविंद सावंत मतदारसंघात आपला माणूस म्हणून 'भाई' या नावाने ओळखले जातात. राजकारणात येण्यापूर्वी एमटीएनलचे अधिकारी म्हणून काम करणाऱ्या सावंत यांनी शिवसेनेत आल्यानंतर केंद्रीयमंत्रिपदापर्यंत मजल मारली. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या अरविंद सावंतांनी 2014 आणि 2019 मध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 2019 च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत सावंत यांना 4,21,937, तर देवरा यांना 3,21,870 इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. अनिल कुमार यांना रिंगणात उतरवले होते. त्यांना 30,348 मते मिळाली होती.

दरम्यान, ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाच्या उमेदवाराशी सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना फुटीनंतर महायुतीमध्ये सहभागी झालेल्या शिंदे गटाने आता 2019 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या लोकसभा जागांवर दावा ठोकला आहे. आगामी निवडणुकीत त्याच मतदारसंघातून आपले उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे कायम राहिल्यास या ठिकाणी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाकडे सावंत यांच्याखेरीज या मतदारसंघातून उमेदवार म्हणून दुसरा चेहरा नाही. त्यामुळे सावंत यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे सावंत यांना विजयाची हॅटट्रिक करण्याची नामी संधी आहे. परंतु महाविकास आघाडीत काँग्रेसकडूनही या मतदारसंघाची मागणी केली जात आहे.

यावेळी पुन्हा काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांना संधी देण्याचे निश्चित झाल्यास जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, हा तिढा सावंत यांच्या हॅटट्रिकच्या मार्गात अडसर ठरू शकतो. या मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मराठी मतांचे आणखी विभाजन होऊ शकते.

नाव (Name)

अरविंद गणपत सावंत

जन्मतारीख (Birth date)

31 डिसेंबर 1951

शिक्षण (Education)

B. sc.

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

अरविंद गणपत सावंत यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. वडिलांचे नाव गणपत पांडुरंग सावंत, तर मातोश्रींचे नाव आशालता सावंत असे आहे. अरविंद सावंत यांच्या पत्नीचे नाव अनुया सावंत असे आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. अरविंद सावंत हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले नेतृत्व आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

मुंबई दक्षिण

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (ठाकरे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

प्रवक्ते म्हणून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या अरविंद सावंत यांचा राजकीय प्रवास एक शिवसैनिक म्हणून सुरू झाला. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अरविंद सावतांनी एमटीएनएलमध्ये कामगार संघटनेचे नेतृत्व हाती घेतले. पुढे 1968 मध्ये सावंत यांची शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या काळात त्यांनी लोकाधिकार समितीच्या माध्यमातून भूमिपुत्रांसाठी अनेक आंदोलनांत सहभाग घेतला. या माध्यमातून एक आक्रमक शिवसैनिक कसा असू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. पुढे 1995 मध्ये त्यांनी एमटीएनएलची नोकरी सोडली. त्यानंतर त्यांना पक्षाकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. नंतरच्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक लढवून ते नगरसेवकही झाले.

विधान परिषदेत त्यांनी झोपडपट्टी विकासाशी संबंधित मुद्दे मांडले. मराठी भाषेला महत्त्व देण्याची मागणी केली आणि गिरणी कामगारांसाठी घरांच्या प्रश्नावर आवाज उठवला. दोनवेळा त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून जाण्याची संधी मिळाली. तिसऱ्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर 2010 मध्ये सावंत यांना पक्षाचे उपनेते आणि अधिकृत प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. पक्षाने 2014 मध्ये त्यांना मुंबई दक्षिण मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीत उतरवले. त्यावेळी मोदीलाटेत सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा जवळपास 1,20,000 मतांच्या फरकाने पराभव केला. संसदेत त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, स्थायी समिती तसेच दळणवळण आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समितीचे सदस्य म्हणून काम केले.

2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा अरविंद सावंत यांना उमेदवारी मिळाली. मतदारसंघात केलेल्या कामांच्या जोरावर त्यांनी या निवडणुकीला सामोरे जात पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. त्यानंतर त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री करण्यात आले. पंरतु शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर सावंत यांनी कसलाही विचार न करता 11 नोव्हेंबर 2019 रोजी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. त्यानंतर विरोधी पक्षाचे खासदार म्हणून त्यांनी सातत्याने मोदी सरकारला धारेवर धरण्याचे काम केले. मुंबई दक्षिण मतदारसंघातील प्रश्न मांडून येथील विकासकामांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करताना दिसून येतात. दरम्यान, पक्षफुटीनंतर बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यांनी ठाकरे गटासोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

शिवसेनेत आणि दक्षिण मुबंई मतदारसंघासाठी 'आपला माणूस' अशी अरविंद सावतांची एक स्वतंत्र ओळख आहे. शिवसेनेच्या स्थापनेवेळी बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे दोन प्रमुख विचार घेऊन ते सामाजिक जीवनात जनसेवेची कामे करण्यासाठी उपलब्ध असतात, अशी चर्चा त्यांच्याबद्दल नेहमीच केली जाते. लोकाधिकार चळवळीच्या माध्यमातून मराठी भाषिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे, यासाठी लढा देण्यात अरविंद सावंत यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, एमटीएनएलला डबघाईतून वर आणण्यासाठी प्रयत्न, पेन्शन योजनेसाठी पुढाकार, सत्तेत असतानाही सरकारला खडे बोल सुनावणे, बेरोजगारीचे प्रश्न, तसेच मराठा आणि धनगर आरक्षणासारख्या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवरही त्यांनी संसदेत सातत्याने आवाज उठवला आहे. कोरोनाकाळात अरविंद सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्यांना अत्यावश्यक सेवा देण्याचे काम युद्धपातळीवर केले होते. कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी ऑक्सिजन घेऊन येणारी ट्रेन भरकटल्याच्या प्रकरणावरून सावंत यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर सडकून टीका केली होती.

शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदापिकाला भाव मिळावा, यासाठीही अरविंद सावंतांनी सत्तेत असताना आणि सत्तेबाहेर असतानाही अनेकदा आवाज उठवला आहे. याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यातही त्यांचा पुढाकार असतो. संपूर्ण महाराष्ट्रभर एसटीने प्रवास करून त्यांनी एसटी कामगारांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. यासह खासदार निधीतून मतदारसंघात जिमखाने, जे. जे. रुग्णालयास अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका, दिव्यांगांना तीनचाकी स्कूटर्स, रेल्वेस्थानकांवर आसनव्यवस्था यांसह अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली आहेत.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा दुसऱ्यांदा पराभव केला होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 च्या लोकसभा निवडणुका भाजप-शिवसेना-आरपीआय युतीने लढवल्या होत्या. त्यातच सावंत यांची ही दुसरी टर्म होती. त्यामुळे युतीच्या माध्यमातून सावंत यांच्या प्रचाराला भाजपचेही बळ मिळाले होते. याशिवाय अरविंद सावंत हे जनतेमध्ये मिसळून काम करणारे नेतृत्व, आपला माणूस म्हणून पुढे आलेले होते. त्यांनी 2014 मध्ये मुंबई दक्षिण या मतदारसंघाचे नेतृत्व करायची संधी मिळाल्यानंतर मतदारसंघात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्या विकासकामांच्या जोरावरच अरविंद सावंत यांनी मतदारसंघात प्रचार केला होता. त्यामुळेच जनतेने पुन्हा एकदा या मतदारसंघातून त्यांना संधी दिली.

अरविंद सावंत हे एक कडवे शिवसैनिक आहेत. खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी मतदारसंघात पक्षाचा विस्तार करण्यावरही जोर दिला. परिणामी, त्यांनी केलेल्या कामांचा आणि शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून वाढवलेल्या जनसंपर्कामुळेही त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. दुसरीकडे, मिलिंद देवरा हे काँग्रेसचे उमेदवार होते. मिलिंद देवरा हे एक क्लास उमेदवार मानले जात होते. हाच मुद्दा पकडत अरविंद सावंत यांनी देवरा क्लास, तर आपण मास लीडर असल्याचा फंडा प्रचारात वापरला होता. तोही निवडणुकीत प्रभावी ठरला होता. या निवडणुकीत सावंत यांचा 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला होता.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

अरविंद सावंत हे जनमानसात मिसळून काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. आपला माणूस किंवा भाई म्हणून संपूर्ण मतदारसंघात त्यांचा परिचय आहे. मतदारसंघात क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेणे, गणेशोत्सवात सांस्कृतिक उपक्रम राबवणे, 'आदिवासींसोबत दिवाळी' या उपक्रमांच्या माध्यमातून ते जनतेमध्ये वावरतात. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क अत्यंत प्रभावी आहे. मतदारसंघात त्यांना एक खासदार म्हणून नाही, तर भाई किंवा आपला माणूस म्हणून कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला भेट घेण्याची मुभा आहे. त्यासाठी कोणती ‘अपॉइन्टमेन्ट’ घेण्याची गरज पडत नाही. अरविंद सावंत हे त्यांच्या दादर येथील मध्यवर्ती कार्यालयात मतदारासांठी नेहमीच उपलब्ध राहतात. लोकांना भेटणे सोयीचे व्हावे, यासाठी सावंत यांनी वेळेची मर्यादा ठेवली नाही. तसेच ते सर्वसामान्य जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होत असल्याने आपला माणूस म्हणून त्यांच्यातील आणि मतदारांतील संपर्काची वीण अधिक घट्ट झाली आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

अरविंद सावंत सोशल मीडियावर सक्रिय असून शिवसेना पक्षफुटीनंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे गटाची बाजू मांडत शिंदे गटावर निशाणा साधला होता. प्रवक्ते म्हणून नियमितपणे पक्षाची ध्येयधोरणे, विकासाची कामे, मतदारसंघातील दौरे, गाठी-भेटी याबाबतची माहिती ते नेहमीच शेअर करताना दिसून येतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

अरविंद सावंत हे एक अभ्यासू आणि प्रभावशाली वक्ते म्हणून ओळखले जातात. ते आपले मुद्दे मांडत असताना एखाद्या संवेदनशील मुद्यावर जितके अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करताना दिसून येतात, त्याप्रमाणे चुकीच्या मुद्द्यावर विरोधकांवर तितक्याच आक्रमकपणे तुटून पडताना दिसून येतात. मात्र, त्यांच्या भाषेचा स्तर कधी खालावलेला दिसून आलेला नाही. मात्र, त्यांनी खासदार नवनीत राणा यांना, ''तू मतदारसंघात कशी फिरते, तुलाही जेलमध्ये टाकू,'' अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याप्रकरणी राणा यांनी गदारोळ करीत सावंत यांच्याविरोधात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहले होते. त्याचप्रमाणे अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांना यापू्र्वीच मुख्यमंत्री करायचे होते, मात्र शरद पवार यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली दिग्गज नेत्यांनी काम करायचे का, असा सवाल करीत शिंदे यांच्या नावाला विरोध केल्याचे विधान केले होते. त्यावरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला होता.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

बाळासाहेब ठाकरे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते अरविंद सावंत हे एक कट्टर शिवसैनिक आणि अभ्यासू वक्ते आहेत. हिंदी, इंग्रजी, मराठी भाषांवर त्यांचे प्रभूत्व आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका ते प्रभावीपणे मांडत आहेत. आपला माणूस म्हणून मतदारसंघातील त्यांचा जनसंपर्कही प्रभावी आहे. शिवसेनाफुटीनंतर अरविंद सावंत यांनी ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाची बाजू ठामपणे मांडली. शिंदे गट शिवसेनेपासून वेगळा होण्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा हात आहे, हे मुद्दे जनतेपुढे मांडून त्यांनी शिवसेनाफुटीवरून शिंदे गटाविरुद्ध जनमत निर्माण करण्यात मोठी भूमिका निभावली आहे. उद्धव ठाकरे गटाला जी सहानुभूती आहे, त्याचा फायदा अरविंद सावंत यांना नक्कीच होऊ शकतो. यासह दोन टर्म त्यांनी केलेल्या विकासकामांना घेऊन ते जनतेमध्ये जाऊ शकतात.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्याच्या मार्गात अडसर दिसून येत आहेत. याचे कारण म्हणजे 2019 च्या निवडणुकीत शिवसेना -भाजप युतीने निवडणूक लढविली होती. त्यावेळी ही जागा शिवसेनेला सुटली होती. विरोधात काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा होते. मात्र आता युती तुटली आहे आणि शिवसेनेतील फूट हा सर्वात मोठा अडसर ठरणार आहे. ठाकरे गट सध्या महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाला आहे. त्यातच ठाकरे गटाकडून अरविंद सावंत ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी आहे. मुंबई दक्षिण हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसकडूनही या मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. सावंत यांना तिकीट मिळाले तरी शिंदे गटाकडूनही या मतदारसंघात उमेदवार उतरवला जाण्याची शक्यता आहे. अर्थात, वाटपात हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटला, तर शिंदे गटाच्या उमेदवाराचे पारडे जड असणार आहे. कारण या मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे शिंदे गटाकडे, तर दोन आमदार भाजपकडे आहेत.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

सद्यःस्थितीत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांनाच पुन्हा एकदा मुंबई दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये जागावाटपामध्ये जर ठाकरे गटाला ही जागा सोडावी लागल्यास अरविंद सावंत यांचा पत्ता कट होऊ शकतो. कारण काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत सावंत यांना दक्षिण मुंबईमधून उमेदवारी देण्यास अडथळा निर्माण झाल्यास त्यांना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा प्लॅन बी तयार आहे. मात्र या ठिकाणी शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई हे सावंत यांना उमेदवारी देण्यावरून नाराज असल्याचीही चर्चा होत आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने 23 जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघावरही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात जागावाटपानंतरच अरविंद सावंत यांच्या उमेदवारीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

(Edited By Roshan More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT