सचिन देशपांडे :
Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत झालेल्या मीटिंग आता संपण्याची शक्यता असताना 'इंडिया' आघाडीने महाराष्ट्रासाठी निश्चित केलेला फॉर्म्युला सर्वच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना मान्य असेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नवे राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे. जागावाटपात हेवेदावे 'इंडिया' आघाडीचा फॉर्म्युला मातीत मिळवू शकतो. त्याचा फटका इंडिया आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या 'इंडिया' आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चांना आता विराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना 'इंडिया' आघाडीचा फॉर्म्युला सर्वांना चालणारा नाही. त्यामुळे इंडिया आघाडीचे देऊळ पाण्यात असल्याची चर्चा राजकीय नेत्यांमध्ये आहे. काँग्रेसने सर्वाधिक जागा स्वतःच्या ताब्यात घेत इतरांना कमी जागांवर निवडणूक लढवा, असा सल्ला दिल्याची माहिती असून त्यामुळेच 'इंडिया' आघाडीत बिघाडीची दाट शक्यता आता वाढली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेस 'बिग ब्रदर'च्या भूमिकेत असून त्याचा फटका इतर राजकीय पक्षांना निश्चित बसेल. इतकेच नाही, तर या आधारावर विधानसभा जागा मिळणार असतील तर काही राजकीय पक्षांचे महाराष्ट्रातील अस्तित्व धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
अशा परिस्थितीत 'इंडिया' आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीतील नेत्यांनी 'इंडिया' आघाडीचा महाराष्ट्राचा फॉर्म्युला ठरविला तो महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना मान्य असेल काय ? हा मोठा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
दिल्लीत संक्रांतीला होणाऱ्या मीटिंगमध्ये 'इंडिया' आघाडीच्या फॉर्म्युल्यावर अंतिम चर्चा होत असताना त्यातील जागावाटपात काँग्रेसला झुकते माप शिवसेनेच्या पचनी पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे.
काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनादेखील कमी जागा देण्याचे संकेत देत काँग्रेसकडे अधिक जागा ठेवण्याची तयारी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे काँग्रेसच्या 'बिग ब्रदर' भूमिकेला बळी पडतील काय की वेगळी चूल मांडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दलित आणि ओबीसी मते असलेल्या 'वंचित'ला किंचित जागा देण्याच्या हालचाली 'इंडिया' आघाडीत असून 'इंडिया' आघाडीच्या बैठकीतदेखील त्यांना बोलावण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत 'इंडिया' आघाडीत, महाविकास आघाडीत 'वंचित'चा किंचित प्रवेश होईल काय ? हा मुद्दा चर्चिला जात आहे. 'वंचित'ला एक-दोन जागांवर थांबवण्याचे दिल्लीश्वरांचे आदेश असताना 'वंचित'चा लाभ मात्र संपूर्ण राज्यात घेण्याची तयारी सुरू झाली आहे. 'वंचित' या किंचित जागांवर होकार देत काँग्रेससोबत फरफटत जाईल काय, अशी विचारणा कट्टर कार्यकर्त्यांमध्ये आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.