AditiTatkare-Ajit Pawar- MahendraThorve-BharatGogawale -MahendraDalvi  Sarkarnama
मुंबई

Mahayuti News : राष्ट्रवादीने शिवसेनेला पुन्हा डिवचले; अजितदादांच्या दालनातील रायगड DPC बैठकीचे शिंदेसेनेच्या आमदारांना निमंत्रण नाही, आदिती तटकरेंची उपस्थिती

Raigad DPC Meeting : नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद असल्याने या दोन्ही जिल्ह्यांच्या नियोजन समितीची बैठक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आयोजित केल्या आहेत. त्यातील रायगडच्या बैठकीला मंत्री म्हणून केवळ आदिती तटकरे उपस्थित होत्या.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 11 February : पालकमंत्रिपदाचा वाद चालू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील एकाही आमदाराला निमंत्रण देण्यात आले नव्हते, त्यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादीने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचल्याचे मानले जात आहे.

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांतील नियोजन समितीच्या बैठका घेण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे नाशिक आणि रायगड (Raigad) जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद असल्याने या दोन्ही जिल्ह्यांच्या नियोजन समितीची बैठक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यातील रायगडची बैठक आज सकाळी झाली. त्या बैठकीला रायगड जिल्ह्यातील मंत्री म्हणून केवळ आदिती तटकरे उपस्थित होत्या.

रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे रोहयो मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे आमदार अजित पवारांच्या (Ajit Pawar) दालनात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे नव्याने वादंग उभे राहण्याची शक्यता आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद पेटलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतल्याने शिवसेनेच्या आमदारांकडून नाराजी व्यक्त होत होती. याबाबत शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. आम्हालाही आताच याबाबतची माहिती मिळाली आहे. याबाबतची तक्रार आम्ही आमचे वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचेही दळवी यांनी स्पष्ट केले.

रायगडच्या संदर्भातील बैठक ही अधिकृत होती की नव्हती. या बैठकीची आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे याबाबतची नाराजी आम्ही बोलून दाखवणार आहोत, असेही दळवी यांनी स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची माहिती आम्हाला देण्यात आलेली नव्हती. आम्ही ही बातमी दूरचित्रवाणीवरून पाहिली. हे जाणीवपूर्वक आहे, याबाबतची माहिती आम्ही घेऊ, तो विषय आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहोत, असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले.

नाशिक, रायगड डीपीसीच्या बैठकांना केवळ मंत्र्यांनाच निमंत्रण

पालकमंत्री नसल्याने नाशिक व रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना केवळ मंत्र्यांना बैठकीचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे आदिती तटकरे आणि भरत गोगावले निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भरत गोगावले हे बैठकीसाठी आले नाहीत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आले होते. नाशिकची बैठक दुपारनंतर होणार आहे. त्या बैठकीला मंत्री म्हणून माणिकराव कोकटे, नरहरी झिरवाळ, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT