
Beed, 10 February : बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. पाटोदा येथील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी ‘बीड जिल्ह्यात आता आष्टीवर मला जरा जास्तच प्रेम करावं लागेल’, असे विधान केले होते. त्याला भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पंकजा मुंडेंनी शिट्टीवाले, घड्याळवाले यांच्यावर प्रेम करावं. भाजपवाल्यांवर प्रेम करायला मी काफी आहे, असा पलटवार धसांनी केला आहे. तसेच, तुमच्या परळी मतदासंघाकडेही लक्ष द्या, असे आवाहन केले आहे.
आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या निवडणुकीत आमच्यावर, आष्टी मतदारसंघावर खूप प्रेम केले आहे. पंकजा मुंडे यांचे निवडणुकीतील व्हिडिओ जरा आष्टी मतदारसंघात फिरवा. त्यांच्यावर प्रेम असणारे लोकच तिथं हजर असतील.
पंकजा मुंडे यांनी शिट्टीवाले, घड्याळवाले यांच्यावर प्रेम करावं. आष्टी मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे. त्यांनी भाजपवाल्यावर प्रेम करू नये, अशी माझी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विनंती राहील, असेही धस यांनी नमूद केले आहे.
ते म्हणाले, आष्टी विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचाच आहे. त्यावर जास्तीचं लक्ष द्या. त्याला आमची काहीही हरकत नाही. पण, आमची मागणी एवढीच आहे की, तुमचा मूळ मतदारसंघ परळी आहे, तिकडं जरा जास्त लक्ष द्या. कारण तिथलं सगळंच हायजॅक झालं आहे. त्यांनी तिकडं बघावं.
आष्टी हा आताच भाजपचा मतदारसंघ कसा झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्या म्हणाल्या होत्या की, केज हा एकच मतदारसंघ माझा आहे. मग आष्टी भाजपचा मतदारसंघ कसा झाला. पंकजा मुंडे जे बोलतात ना, त्यावर त्यांनी ठाम राहावं. निवडणूक कालावधीत त्यांचा भाजपचा एकच मतदारसंघ होता. याबाबत त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. निवडणुकीत भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता. आता पवित्र विवाह कसा झाला, असा सवाल सुरेश धस यांनी केला.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?
बीड जिल्ह्यात आता आष्टीवर मला जरा जास्तच प्रेम करावं लागेल. तो परळी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेला आहे ना. आष्टी हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे. मंत्री म्हणून मला जरा काकणभर जास्तच प्रेम करावं लागेल. मला आष्टीत सारखं यावं लागेल. भाकरी भाजी द्याल ना. मी आष्टीतील प्रत्येक कामात लक्ष देणार आहे. पण, त्याचा अर्थ तुम्हाला जसा घ्यायचा आहे, तसा घेऊ नका, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.