Mumbai, 11 June : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण नव्हतं, त्याची चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगली आहे. कारण, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘घाईगडबडीत राहिलं असेल. मात्र याची नोंद केंद्रीय नेतृत्वाने घेतली पाहिजे,’ असं स्पष्टीकरण दिले आहे.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (ता. ९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्या शपथविधीला देशभरातील प्रमुख आणि मान्यवरांना निमंत्रण होते. मात्र, महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना निमंत्रण नव्हतं. असं या पक्षाचे प्रमुख नेते तथा राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं.
मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) म्हणाले, राज ठाकरे यांना मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हतं. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्यावर कानावर हे घातलं जाईल. घाईगडबडीत निमंत्रण द्यायचं राहिलं असेल. काहींना निमंत्रण जात नाहीत. मात्र, राज ठाकरे यांना निमंत्रण नसेल तर त्याची नोंद केंद्रीय नेतृत्वाने घेतली पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘लोकसभा निवडणुकीत मर्यादा सोडून प्रचारात विधानं करण्यात आली,’ असे म्हटलं आहे. त्यावरही भाष्य करताना मुनगंटीवार म्हणाले, सत्तेच्या स्वार्थासाठी समाजात विष कालावण्याचं काम उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात झालं आहे. देशभावनेसाठी काम केलं पाहिजे. समाजात आम्ही जातीसाठी काम करत नाही. समाजात उद्रेक होता कामा नये. पण विरोधकांनी कायम जातीचं राजकारण केलं आहे.
मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अशांतता आहे, तेथील संघर्षाकडे कोण पाहिल, असा प्रश्न सरसंघचालक भागवत यांनी उपस्थित केला होता. त्याबाबत मुनगंटीवार म्हणाले, कुठेही अशांतता असू नये. देशविरोधी शक्तींना याचा फायदा होऊ नये. मणिपूरमध्ये 7 दशकांपासून हे होत आहे. केंद्र सरकार त्यावर लक्ष देऊन आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय संघावर सोपवला आहे, याबाबत मला काही कल्पना नाही. मी विनोद तावडे यांना बोललो. ते म्हणाले की, पक्षात वरिष्ठ लोक आहेत, निर्णय पक्षच घेईल. आरएसएस कधी या गोष्टींत पडत नाही. व्यक्तीवर संघ कधीच प्रेम करत नाही, विचारांवर प्रेम करतो, असेही मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.