Raj Thackeray-Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politic's : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयावर राज ठाकरे नाराज; राऊतांनी तातडीने गाठले शिवतीर्थ, दोघांत दीड तास चर्चा

Sanjay Raut Meet Raj Thackeray : चंद्रपूर महापौर निवडीवरून राज्यात खळबळ उडाली असून शिवसेना उद्धव पक्षाच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर राज ठाकरे नाराज झाल्याची चर्चा रंगली. संजय राऊत यांनी शिवतीर्थवर भेट घेत चर्चा केली.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 12 February : चंद्रपूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा विषय गेली तीन दिवसांपासून राज्यात गाजत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे सेनेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे नाराज झाल्याची माहिती असून त्यांच्या नाराजी कानावर येताच खासदार संजय राऊत यांनी तातडीने शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंशी चर्चा केली आहे. तब्बल एक ते दीड तास या दोघांमध्ये चर्चा सुरू होती.

चंद्रपूर (Chandrapur) महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मदतीशिवाय ना काँग्रेसची सत्ता येऊ शकते, ना भाजपची. चंद्रपूरच्या सत्तेची चावी ठाकरे सेनेच्या हाती होते. ठाकरे सेना काँग्रेससोबत जाईल, असे एकंदरित वातावरण आणि तसे संकेत मिळत होते. मात्र, महापौरपदाची मागणी शिवसेनेनेही केली होती. अगोदरच काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात महापौरपदापरून वाद असताना शिवसेनेच्या मागणीमुळे मोठा पेच निर्माण झाला होता.

काँग्रेस आणि ठाकरे सेना यांच्यात महापौरपदावरून अडलेले घोडे पाहून भाजपने सत्तेचे फास फेकले. त्यात शिवसेनेच्या चंद्रपूरमधील स्थानिक नेत्यांनी भाजपसोबत सत्तेचा करार केला. शिवसेनेला सव्वा वर्षासाठी महापौरपद देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच इतर पदेही वाटून घेण्याचा फार्म्युला ठरला. त्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या आमदाराचा ग्रीन सिग्नल असल्याची चर्चा आहे.

चंद्रपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तसे ते मनसेचे संदीप देशपांडे यांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येते. त्याला कारणही तसेच आहे. कारण कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये मनसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी शिसेनेने नाराजी बोलून दाखवली होती, त्यामुळे आता मनसेनेची वेळ होती.

संदीप देशपांडे यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि राज ठाकरेंची नाराजीची कुणकुण लागताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तातडीने शिवतीर्थ गाठले आहे. त्यांच्यात तास ते दीड तासापासून चर्चा सुरू होती. चर्चा तपशील समजू शकला नसला तर शिवसेनेच्या दुहेरी भूमिकेवर राज ठाकरेंनी बोट ठेवल्याचे सांगितले जात आहे. आता या वादावर काय तोडगा निघतो, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT