Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray On Manoj Jarange : जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण ? राज ठाकरे नेमके काय म्हणाले ?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : जालना येथील अंतरवाली सराटी येथे राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू झालेले आहे. यावर ठोस निर्णय घेण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दुसऱ्यावेळी मुदतवाढ दिलेली आहे. जरांगे पाटलांच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी उघडपणे विरोधात भूमिका मांडल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन आरक्षणाबाबत भूमिका व्यक्त केलेल्या आहेत. (Latest Political News)

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत तांत्रिक अडचणी असल्याची जाणीव करून दिली होती. जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी लावलेल्या जोरानंतर राज्यातील इतर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून कुणीतरी राज्यातील वातावरण गढूळ करत असल्याची शक्यता वर्तवली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आपल्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरची अंतिम मुदत दिलेली आहे. यावर अंमलबजावणीसाठी सरकारच्या वतीने कामही सुरू झालेले आहे. याला ओबीसी समाजाने तीव्र विरोध केला आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'मराठा समाजाला अशाप्रकारे कोणतेही आरक्षण मिळणार नाही, असे काही घडणार नाही, हे मी आधीच त्यांच्यासमोर स्पष्ट केले होते. आता आरक्षणासाठी खरेच जरांगे पाटील लढतात का, त्यांच्या मागे आणखी कुणीतरी आहे ? यातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र डिस्टर्ब करायचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे राज्यात दिसणारे हे चित्र इतके सरळ नाही, यामागे कोण आहे हे कालांतराणे स्पष्ट होईलच.'

दरम्यान, राज्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने दुष्काळीस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र, राज्यात सुरू असलेल्या या आंदोलनांमुळे मूळ प्रश्न भरकटले जातात. लोक ज्या प्रश्नांनी त्रस्त आहेत, ते विषय पुढे येतच नाहीत, अशी स्थिती झालेली आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी या वेळी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT