Sudhir Mungantiwar-Pramod Mahajan Sarkarnama
मुंबई

Sudhir Mungantiwar : ...तेव्हाच मी राजकारण सोडण्याचा विचार केला होता; मुनगंटीवारांनी बोलून दाखवली मनातील गोष्ट

Sudhir Mungantiwar On Pramod Mahajan : हजारो वर्षांपासून गोड पाण्याच्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. पण, समुद्र गोड होत नाही. हे खरं आहे. पण, नद्यांनी अजूनही वाहनं सोडलं नाही.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 05 January : लोकसभेच्या 1989 च्या निवडणुकीत मी पराभूत झालो. तेव्हा आचार्य विनाबा भावे यांचे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या डोक्यात राजकारण सोडण्याचा विचार आला होता. पण, (स्व.) प्रमोद महाजन यांच्या एका वाक्याने माझा राजकारणातील प्रवास थांबला नाही. अन्यथा माझ्या मनात नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा विचार होता, अशी कबुली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, माझे वडिल संघ स्वयंसेवक म्हणून आणीबाणीत 19 महिने जेलमध्ये गेले नसते, तर मी राजकारणात आलो नसतो. मी डॉक्टर झालो असतो. महाविद्यालयीन जीवनात म्हणजे 1989 मध्ये लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत मी पराभूत झालो. तेव्हा माझ्या डोक्यात राजकारण सोडण्याचा विचार आला होता. कारण तेव्हा मी आचार्य विनोबा भावे यांचे पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकात पत्रकाराने विनोबा भावेंना तुम्हा सक्रीय राजकारणात का जात नाही, असा प्रश्न विचारला होता.

तेव्हा आचार्य भावे यांनी, ‘हजारो वर्षांपासून गोड पाण्याच्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. पण, समुद्र कधीच गोड होत नाही. तसं राजकारणाचं आहे. कितीही चांगली लोकं राजकारणात आली तरी राजकारण काय शुद्ध होईल, यावर माझा विश्वास नाही,’ असे उत्तर दिले होते, असेही मनगुंटीवारांनी नमूद केले.

ते म्हणाले, विनोबा भावे यांचे ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात राजकारण सोडण्याचा विचार आला होता. आपण राजकारण सोडलं पाहिजे, ही आपली चूक आहे. आपण आपलं काम केलं पाहिजे. पण (स्व.) प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांनी त्या निवडणुकीनंतर आमच्या पक्षाच्या पराभूत उमेदवारांची एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत ‘कोणाला काय विचाराचे आहे का,’ असे विचारणा केली.

राजकारण चांगलं नाही. राजकारणात काहीही होतं, असं विनोबा भावे म्हणतात, असं म्हणून आचार्य भावे यांचंं मी उदाहरण सांगितलं. पण, प्रमोद महाजन यांनी एक वाक्य म्हटलं आणि माझा राजकारणातील प्रवास थांबला नाही; अन्यथा माझ्या मनात नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा विचार होता.

महाजन म्हणाले, ‘हजारो वर्षांपासून गोड पाण्याच्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. पण, समुद्र गोड होत नाही. हे खरं आहे. पण, नद्यांनी अजूनही वाहनं सोडलं नाही. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होतं आणि ते पुन्हा गोड पाणी होतं. त्यामुळे राजकारणातसुद्धा चांगल्या गोष्टी घडणार नाहीत, हा विचार तू करू नको, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी राजकारणात राहिलो, असेही सुधीरभाऊंनी स्पष्ट केले.

‘आरआरआबांनी मला राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली होती’

सुधीर मुनगंटीवार यांनी आर. आर. पाटील यांच्याशी असलेल्या मैत्रीवर या वेळी प्रकाश टाकला. ते म्हणाले, (स्व.) आर. आर. पाटील यांच्याशी माझी फार चांगली मैत्री होती. माझ्यावर ते प्रेमही करायचे. मी अर्थमंत्री झाल्यानंतर कोणी मागणी न करतानाही त्यांच्या स्मारकासाठी मी पैसे दिले होते. ते दुसऱ्या पक्षात असले तरी ते मला आवडायचे.

माझ्या आणि त्यांच्या विचारातच बरेचसे साम्य होते. मला अजूनही आठवते. एक दिवस मला त्यांनी घरी जेवायला बोलावले आणि मला ते म्हणाले, ‘माझ्या पक्षात (राष्ट्रवादी काँग्रेस) या. मी उद्या तुम्हाला मंत्री करतो.’ त्यावर मी त्यांना सांगितले की, कदाचित तुम्हाला माहिती नसेल. माझे वडिल चंद्रपूरहून येऊन काठीने मला मारतील.

आरआरआबांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मात्र, दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारही माझ्या मनाला शिऊ शकत नाही. जिना यहाँ, मरना यहाँ. गर्दीशमें तारे रहेंगे तो कभी रहेंगे. भाजपत आम्ही सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मंत्रिपदासाठी कधीच काम केलेले नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT