Nagar News : लोकसभा निवडणुकीसाठी आता गहिरे राजकीय रंग भरू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. राणी लंके यांनी थेट लोकसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे.
राणी लंके यांचे पती नीलेश लंके हे आमदार आहेत आणि ते अजित पवार गटाचे आहेत. राणी लंके यांच्यासाठी राजकारण नवीन नाही. त्या यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. शिवाय आमदार लंके यांचा नगर जिल्ह्यासह राज्यात दांडगा संपर्क आहे. त्यामुळे राणी लंके यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात जाहीर वक्तव्य केल्याची चर्चा आहे. किंबहुना ही आमदार लंके यांची राजकीय खेळी असल्याचेही बोलले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आमदार लंके यांनी अजित पवार यांना मतदारसंघात आणत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तसेच कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करून घेतली होती.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शिर्डीत राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. हीच संधी साधून राणी लंके यांनी लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय चर्चांना अधिकच पेव फुटले आहे. त्याचवेळी ही उमेदवारी जाहीर करण्यामागे शरद पवार यांचीच खेळी असल्याचीही चर्चा जोर धरत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीअगोदर आमदार नीलेश लंके यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत होते. तसा आमदार लंके यांनीदेखील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवला होता. कोविडच्या दुसऱ्या लाटेत आमदार लंके यांनी शरदचंद्र पवार कोविड सेंटर सुरू केले होते. ते स्वतः विनामास्क या सेंटरमध्ये तळ ठोकून होते. कोरोनाबाधितांना देत असलेल्या उपचारांवर लक्ष ठेवून होते. कोविड सेंटर आणि त्यांच्या सामाजिक कार्यक्रमांतून त्यांची राज्यासह देशभरात लोकप्रियता मिळवला. आजही ती लोकप्रियता टिकून आहे.
शरद पवार यांनी लोकसभेला आमदार लंके यांच्याकडे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरुद्ध पर्याय म्हणून पाहिले होते. परंतु, पक्षफुटीनंतर आमदार लंके अजित पवार गटाकडे गेले. त्यामुळे भाजपचे खासदार सुजय विखेंविरुद्ध पर्याय कोण, याची चाचपणी महाविकास आघाडीकडून होत आहे. असे असतानाच आमदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी आज पाथर्डीत आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी येथून 'शिवस्वराज्य यात्रे'चा प्रारंभ करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षपूर्तीनिमित्ताने 'शिवराय मनामनात, शिवराय घराघरात' पोहोचवण्यासाठी 'शिवस्वराज्य यात्रा' काढण्यात येत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात ही यात्रा जाणार असल्याचे राणी लंके यांनी सांगितले. या यात्रेनिमित्त लोककल्याणाचा संकल्प घेतला आहे. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी आपण उमेदवार आहोत. आपल्याविरोधात कोणताही उमेदवार असला, तरी काही फरक पडत नाही. आपण ही निवडणूक लढवणारच. त्यासाठी आपण सज्ज आहोत, असे राणी लंके यांनी म्हटले आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आहे. शरद पवारांना ही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्यासाठी ते सक्षम उमेदवारांच्या शोधात आहे. आमदार नीलेश लंके यांच्याकडे त्याच नजरेतून शरद पवार पाहत होते. परंतु आमदार लंके आता अजित पवार गटात आहेत. तरीदेखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे नीलेश लंके यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. तसे त्यांच्या कृतीतूनदेखील दिसते.
मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेरमध्ये आले होते. तिथे त्यांचा जाहीर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावेळी लावण्यात आलेल्या फलकांवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र होते. अजित पवार यांनीदेखील त्यावर हरकत घेतली नाही. यानंतर अजित पवार यांचे कर्जत (जि. रायगड) येथे राज्यस्तरीय अधिवेशन आणि विचारमंथन कार्यक्रम झाले. तिथे नीलेश लंके उपस्थित होते.
त्यानंतर शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी बैठक घेतली. तिथेदेखील आमदार नीलेश लंके हाच सक्षम पर्याय असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी याकडे दुर्लक्ष केले असले, तरी शरद पवार गटाकडूनदेखील आमदार नीलेश लंके यांचेच नाव घेतले जाते.
आता आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. आपण कोणत्या गटाच्या उमेदवार आहोत, हे अजून राणी लंके यांनी जाहीर केलेले नाही. अजित पवार गटाने महायुतीकडे लोकसभेच्या ज्या जागांवर दावा केला आहे, त्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा समावेश नाही. मग राणी लंके नेमकी उमेदवारी कोणाकडून करणार, हा प्रश्नच आहे.
शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची ठरल्यास नेमकी राजकीय गणिते जुळतील का? याची तर ही चाचपणी नाही ना! याकडेदेखील राजकीय विश्लेषण पाहत आहे. तसे झाल्यास महायुतीचे भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांना महाविकास आघाडीकडून राणी लंके यांच्या माध्यमातून आव्हान राहील. नगर दक्षिण लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून वेळप्रसंगी वेगळाच मोहरा फिरवला जाणार, असेच चित्र राणी लंके यांनी आपली उमेदवारी जाहीर करून निर्माण केले आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.