बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत पेट्रोल पंपावरील दीड कोटी रुपयांच्या उधारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना तीव्र शब्दांत फटकारले.
अजित पवारांनी उधारी थांबवण्याचे आदेश देत संबंधितांची नावे व वसुलीची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.
समितीचे पैसे सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी व हमाल यांचे असल्याचे सांगत पवारांनी भविष्यात उधारी वसूल करण्यासाठी कठोर कारवाईचा इशारा दिला.
Baramati, 28 September : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत एका कार्यकर्त्याने दिलेले पत्र वाचून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संताप अनावर झाला. बाजार समितीच्या बारामती येथील एका पेट्रोल पंपावरील दीड कोटी रुपयांची उधारी पाहून अजितदादांनी बाजार समितीचे संचालक आणि पदाधिकाऱ्यांना झाप झापले. तू उधारी कशाला देतो, तुला जेलमध्ये टाकेन, तुमच्या काय बापाची मार्केट कमिटी आहे का? तुम्ही काय हजामती करता का रे? अशा शब्दांत अजित पवारांनी भोंगळपणे कारभार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची बिनपाण्याने खरडपट्टी काढली.
संबंधित कार्यकत्याचे पत्रात ‘आपल्याकडे दुप्पट कामगार आहेत, तरीही बारामती बाजार समितीत (Baramati Bazar Samiti) पुन्हा कामगार भरतीचा घाट घातला आहे. बारामतीतील पेट्रोल पंपाची उधारी दीड कोटी रुपये झाली आहे,’ असा उल्लेख होता. तो वाचून अजितदादा म्हणाले, पेट्रोल पंपाची उधारी दीड कोटी झाली. तू कशाला उधार देतो. मी तुला जेलमध्ये टाकीन हं, तुला सांगतोय. विश्वासने (विश्वासराव देवकाते) सांगितलं किंवा आणखी कोणी सांगितली तरी द्यायचं नाही. हा काय बावळटपणा चाललाय?
दीड कोटी रुपयांचे डिझेल-पेट्रोल कोणाला दिलं? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. त्यावर संंबंधित पदाधिकाऱ्याने वीस जणांना दिल्याचे सांगितलं. ते वीसजण कोण आहेत? आयला येडी आहेत की काय रं ही? म्हणजे मी वरून पैसे आणायचे आणि या नालायकांनी दीड दीड कोटीचं पेट्रोल-डिझेल उधारीवर द्यायचं? तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी. तुझ्याही बापाची नाही आणि माझ्याही बापाची नाही. ती माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची आणि हमाल मापाड्यांची आहे. तुम्ही काय करता रे, हजामती करता का? असेही त्यांनी नेतेमंडळींना खडसावले.
बाजार समितीच्या संबंधित पदाधिकाऱ्याने एक महिन्याची मुदत दिल्याचे सांगितले. त्यावर एक महिना नाही ना काही नाही. मीपण पंप चालवतोय. बारामती खरेदी-विक्री संघही पेट्रोल पंप चालवतोय. रवींद्र माने (संघाचे अध्यक्ष) आहे कार रे? तुझी उधारी आहे का? त्यावर त्यांनी डायनामिक्स डेअरीकडे उधारी असल्याचे सांगितले. अजित पवारांनी ‘डायनामिक्सच ठीक आहे, ते कुठे पळून जाणार आहेत. ते हजारो कोटी रुपयांचे मालक आहेत,’ असे स्पष्ट केले.
कुणा-कुणाची उधारी आहे, ते मला दाखव. मागच्या वेळी बारामती खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला होता. पुढाऱ्यांची उधारी झाली होती, त्यातील एकानेही भरली नाही. त्याची एकशे एकची प्रकरणे (जप्तीची कारवाई) करावी लागली होती. सर्वसामान्यांसाठी ह्या संस्था काढलेल्या आहेत, असेही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.
ते म्हणाले, बारामती दूध संघाचा चेअरमन संजय कोकरे आले आहे का? त्यालाही सांगा. त्याचेही पाच-सहा पंप झालेत. कुणा-कुणाची किती उधारी आहे, हे मलाही कळलं पाहिजे आणि माळेगाव, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एमडींनाही सांगा की, तिथंपण कोणाची उधारी होता कामा नये. ‘छत्रपती’चे चेअरमन तर उधार देणारच नाही.
राठोड हे तुमचं काम नाही, याची मला जाणीव आहे. पण, बारामती बाजार समितीचे चेअरमन, सचिव आणि यादव किंवा मुळीक, असे तुम्ही बसा. यामध्ये मेजर ज्यांच्याकडे उधारी आहे, त्यांना सांगा की, दादांनी यात लक्ष घातले आहे. ही उधारी द्यावी लागेल नाही. नाही वेगळ्या पद्धतीने ही उधारी वसूल करेन,असं दादा म्हटले आहेत, असं त्यांना सांगा. नाही तर त्याच्या मागं काहीही भुंगा लावीन, असा इशाराच अजित पवारांनी दिला.
अजित पवार म्हणाले, मी एवढं सांगतोय, बाहेर फुशारक्या मारतोय आणि तुम्ही असेल धंदे करताय का? बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दीड कोटी याच्यामुळं मला कळंल. एवढे दिवस यांनी काय झोपा काढल्या की काय? बारामती बाजार समितीने स्वभांडवलातून काय काम केलं आहे, ते मला दाखव. आम्ही आपलं आणतोय पैसा आणि तुम्ही उधळपट्टी करताय, शहाण्याने.
प्र: अजित पवारांचा रागाचा पारा का चढला??
उ: पेट्रोल पंपावरील दीड कोटी रुपयांच्या प्रचंड उधारीमुळे.
प्र: अजित पवारांनी कोणाला इशारा दिला?
उ: बाजार समितीचे संचालक, पदाधिकारी आणि उधारी देणाऱ्या संबंधितांना.
प्र: समितीचा पैसा कोणाचा असल्याचे पवारांनी सांगितले?
उ: शेतकरी, व्यापारी आणि हमाल-मापाडींचा.
प्र: पवारांनी पुढे काय कारवाई सूचित केली?
उ: उधारी तातडीने वसूल न झाल्यास कठोर आणि वेगळ्या पद्धतीने वसुली करण्याचा इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.