Narendra Modi- Amol Kolhe
Narendra Modi- Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe criticism of Narendra Modi : मग मतं मागायला महाराष्ट्रात..., कोल्हेंनी मोदींना सुनावले !

Chaitanya Machale

Shirur Lok Sabha Constituency : गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या कमी असतानाही केंद्र सरकारने गुजरातमधील दोन हजार टन कांद्याची निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अन्यायकारक आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ.अमोल कोल्हे शुक्रवारी शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत कोल्हे फिरत आहेत. नागरिकांशी संवाद साधत, त्यांच्याशी चर्चा करत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती मतदारांना देत कोल्हे आपला प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या वेळी देवदत्त निकम, स्वप्नील गायकवाड, शेखर पाचुंदकर, दामु घोडे, शंकर जांभळकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.या मतदारसंघातून कोल्हे यांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आढळराव पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर आढळराव पाटील यांनी शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले होते. लोकसभेच्या जागावाटपामध्ये शिरूरची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला आल्याने आढळराव पाटील यांची अडचण झाली होती. त्यामुळे आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून ते या लोकसभेच्या निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.

उमेदवारी मिळाल्यापासून कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता गुजरातच्या दोन हजार टन कांद्याची निर्यातबंदी उठविण्यात आल्याने खासदार कोल्हे यांनी कडक शब्दांत केंद्र सरकारचा समाचार घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीकेची झोड उठविली आहे. हा निर्णय घेऊन मोदी सरकारने त्यांना फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता असल्याचे दाखवून दिले आहे.त्यामुळे आता मते मागायला गुजरातलाच जा, इकडे येऊच नका, अशा कडक शब्दांत खासदार कोल्हे यांनी नरेंद्र मोदींना सुनावले.

कोल्हे म्हणाले, तुमच्या कांद्याची माती होती. तुमच्या ताटात माती कालवली जाती, याच्याशी मोदी सरकारला काही देणेघेणे नाही. हे आजच्या निर्णयावरून मोदी सरकारने दाखवून दिलं आहे. मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असेल तर आपण पण त्यांना मतं मागायला तिकडेच जा. इकडे येऊच नका, असे स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे.

अमोल कोल्हे यांचा अर्ज वैध

शिरूर लोकसभेचे उमेदवार खासदार अमोल कोल्हेच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. अपक्ष उमेदवार आफताब शेख यांनी धर्मेंद्र परदेशी यांच्या मार्फत याची तक्रार केली होती. मात्र निवडणूक आयोगाने याची पडताळणी करत कोल्हे यांचा अर्ज वैध ठरविला. पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये एक गंभीर गुन्हा दाखल आहे, असं असताना त्याचा उल्लेख कोल्हे यांनी त्यांच्या शपथपत्रात केला नसल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये तथ्य न आढळल्याने निवडणूक आयोगाने कोल्हेंचा अर्ज वैध ठरवला. त्यानंतर कोल्हेनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील तसेच विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप केला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT