Appasaheb Jagdale
Appasaheb Jagdale Sarkarnama
पुणे

Indapur Politic's : हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यातील कारखान्यांविरोधात आप्पासाहेब जगदाळेंनी उगारले आंदोलनास्त्र

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील साखर कारखान्याच्या विरोधात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तथा इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी आंदोलनास्त्र उगाारले आहे. इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा आणि कर्मयोगी साखर कारखान्याने गाळप झालेल्या उसाचे बिल वेळेत न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी (ता. १७) निरा भिमा कारखाना येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे, असे जगदाळे यांनी सांगितले. (Appasaheb Jagdale's agitation against sugar factories of Harshvardhan Patil)

इंदापूर (Indapur) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जगदाळे बोलत होते. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील, कार्याध्यक्ष महादेव घाडगे, उपाध्यक्ष अजित टिळेकर, माजी सभापती प्रशांत पाटील, विजय घोगरे, अभिजीत घोगरे, तुकाराम घोगरे, सचिव विजय गायकवाड, सुरेश शिंदे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या गोटात सामील झाले होते. विधानसभेलाही ते पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मात्र, बाजार समितीच्या निवडणुकीपासून दोघांमध्ये अंतर वाढत गेले. दुरावलेले जगदाळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या (NCP) जवळ येताना दिसत आहेत. कारण, राष्ट्रवादीसोबत युती करून त्यांनी इंदापूर बाजार समितीची निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा.

इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीनंतर झालेल्या संचालकांच्या सत्कार समारंभात आप्पासाहेब जगदाळे यांनी नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांना सुनावले होते. त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी जगदाळे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकारणात निवडणुका जवळ येतील, तशा अनेक घडामोडी बघायला मिळू शकतात.

जगदाळे म्हणाले की, नीरा भीमा आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने एक डिसेंबरपासून गाळप झालेल्या उसाचे पैसे अजून दिलेले नाहीत. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. असा प्रकार गेली दोन-तीन वर्ष घडत असून वेळेवर बिले दिली नाहीत. कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही. शेतकऱ्यांची ही संस्था चालावी म्हणून आम्ही आणि माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कारखान्याला बँकेच्या माध्यमातून नेहमी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आत्मक्लेष आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधी नसून यात कोणतेही राजकारण नसल्याचेही जगदाळे यांनी स्पष्ट केले. कारखाना 2014 पर्यंत कारखाना सुरळीत चालत असताना 2014 पासूनच असं काय घडलं की कारखाना अडचणीत आला, असा सवाल प्रशांत पाटील यांनी उपस्थित केला.

शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील म्हणाले की, ऊस बिलाच्या आंदोलनासाठी दहा मे रोजी प्रशासनाला निवेदन देत १५ तारखेपर्यंत बिले काढा; अन्यथा १७ तारखेला आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, याबाबत कार्यवाही न झाल्याने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT