Pune, 03 April : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीचा उपचारास विलंब झाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. ‘पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने पैशाअभावी भिसे यांच्या पत्नीला ॲडमिट करून घेण्यास नकार दिला. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून फोन करूनही हॉस्पिटलने ऐकलं नाही, त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. त्या धावपळीत वेळ गेल्याने त्रास वाढत जाऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंगेशकर हॉस्पिटलची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे,’ असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही फेसबुक पोस्ट करून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर आरोप केला आहे. तनिषा सुशांत भिसे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ०२ एप्रिल) घडली आहे. प्रसूतीचा त्रास होत असल्याने तनिषा भिसे यांना नातेवाईकांनी उपचारासाठी पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आणले होते. मात्र, दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने उपचारासाठी दहा लाख रुपयांची मागणी त्यांच्याकडे केली होती, असेही गोरखे यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, तनिषा भिसे यांच्या उपचारासाठी अडीच लाख भरण्याची तयारी नातेवाईकांनी केली होती. मात्र, त्यानंतरही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ( Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाने प्रसूतीचा त्रास होणाऱ्या तनिषा यांना ॲडमिट करून घेण्यास नकार दिला. भिसे कुटुंबीयांनी विनंती करूनही हॉस्पिटल प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
तनिषा सुशांत भिसे यांना ॲडमिट करून घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन करण्यात आला हेाता. मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचंही ऐकलं नाही, त्यामुळे नातेवाईकांनी तनिषा भिसे यांना इतर हॉस्पिटमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. त्या कालावधीत वेळ गेला, असेही गोरखे यांनी नमूद केले.
तनिषा भिसे यांना मंगेशकर हॉस्पिटलमधून दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात त्यांना ॲडमिटही करण्यात आले. त्या ठिकाणी तनिषा यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, त्रास वाढत गेल्याने तनिषा ह्यांचा मृत्यू झाला. मंगेशकर हॉस्पिटलच्या आडमुठ्या धोरणामुळे तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आमदार गोरखे आणि भिसे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. आमदार अमित गोरखे यांनी मंगेशकर हॉस्पिटलची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
अधिवेशनात विषय मांडणार : आमदार अमित गोरखे
यासंदर्भात आमदार अमित गोरखे म्हणाले, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे गरिबांसाठी ट्रस्ट म्हणून चालवलं जातं. पण, पैशाअभावी प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला ॲडमिट करून घेण्यास नकार देण्याचा गंभीर गुन्हा हॉस्पिटलने केलेला आहे. हॉस्पिटलच्या अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. हा विषय मी येत्या अधिवेशनात मांडणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक पाऊले उचलावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.
सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था तर... : सुषमा अंधारे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही फेसबुक पोस्ट लिहून तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या, सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्या मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे, ज्याची कल्पनाच न केलेली बरी..
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.