Pune, 22 April : राज्यातील तरुणाई ऑनलाइन लॉटरीच्या विळख्यात सापडली आहे. नवी पिढी लॉटरीच्या मागे लागून बरबाद होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र, केरळमधील ऑनलाईन ‘लॉटरी’चा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारची नऊ आमदारांचा समावेश असलेली समिती केरळ दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी आमदारांचाही समावेश असणार आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केरळ (Kerala) राज्य लॉटरीचा अभ्यास दौरा करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य (पेपर) लॉटरीच्या उत्पन्नाद्वारे सरकारच्या महसुलात वाढ करण्याकरिता हा केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास दौरा असणार आहे. या दौऱ्यानंतर समिती सरकारला एक महिन्यात अहवाल सादर करायचा आहे.
राज्य सरकारने (State Government) जाहीर करण्यात आलेल्या समितीमध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार असणार आहेत. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा एक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक आणि काँग्रेसचा एक आमदार या समितीमध्ये असणार आहे.
या समितीमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, अमित साटम, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत नरके, विठ्ठल लंघे अजित पवार गटाचे चेतन तुपे, शेखर निकम, शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील, उद्धव ठाकरे गटातून सुनील प्रभू, आणि काँग्रेसकडून आमदार अमित देशमुख हे या समितीमध्ये असणार आहेत.
याबाबत आम आदमी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. आपचे नेते विजय कुंभार याबाबत म्हणाले, लॉटरी म्हणजे कायदेशीर जुगारच आणि आता राज्य सरकार त्याच जुगारावर तिजोरी भरायचं स्वप्न पाहतंय. धक्कादायक म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांची समिती बनवून केरळच्या लॉटरी मॉडेलचा अभ्यास सुरू आहे. हेच का विकासाचं व्हीजन? अहो अभ्यास कसला? सरळ 'लॉटरी राज्य' करायचं ठरवलंय वाटतं. उद्योगधंदे, गुंतवणूक, रोजगार सोडून सरकार लॉटरी विकून उत्पन्न वाढवणार? हीच का आत्मनिर्भर महाराष्ट्राची वाटचाल?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.