Ambegaon APMC Election: पक्षांतर्गत मुस्कटदाबीमुळे थेट बंडाची राज्यातील परंपरा आता राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनाही गळ्याचा फास होत चालली आहे. त्यांच्याच हक्काच्या मतदार संघात त्यांचेच कट्टर कार्यकर्ते सभापती तथा २०१४च्या शिरुर लोकसभा निवडणूकीतील उमेदवार देवदत्त निकम (Devdatta Nikam) यांनी दंड थोपटले आहेत. देवेंद्र शहा, बाळासाहेब बेंडे आणि प्रदीप वळसे पाटील या त्रयींच्या आत्मकेंद्री राजकारणाने हा स्फोट झाला असून वळसे-पाटील यांचा उत्तराधिकारी कोण याचेही उत्तर या निवडणूकीने जिल्ह्याला मिळणार आहे.
अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित युवक म्हणून देवदत्त निकम यांची वीस वर्षांपूर्वीची राजकारणातील इंट्री आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघात कायमच लक्षवेधी ठरली आहे. वळसे-पाटील यांचेशी अगदी कट्टर राहून त्यांनी वळसेंचे अगदी गावपातळीवरचे राजकारण स्वत:हून हाताळले व गावागावात वळसे-पाटील, राष्ट्रवादी पक्ष आणि स्वत: अशी सर्वांचीच प्रतिमा उत्तम ठेवली.अर्थात सन २००९ पासून बदललेल्या आंबेगाव-शिरुर मतदार संघात आजही वळसेंनंतर निकम यांचेच नाव घेतले जाते हे विशेष.
हीच प्रतिमा त्यांना कामी आली आणि भिमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्षपद, आंबेगाव बाजार समितीचे सभापतीपद संभाळताना त्यांनी तिथेही कामगिरी उत्तम केली. याच उत्तम कामगिरीची बक्षीसी त्यांना केंद्रीय नेते शरद पवार यांनी सन २०१४ मध्ये दिली आणि थेट आढळराव यांच्या समोर थेट लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांना संधी दिली. वळसेंचे माणसपूत्र म्हणून मतदार संघ त्यांचेकडे पाहत असताना मात्र वळसे यांचे दोन्ही पुतणे प्रदीप वळसे पाटील व विवेक वळसे पाटील यांचेकडून मात्र मतदार संघातील सामान्य मतदार, शेतकरी यांचेकडे हवे तितके लक्ष दिले जात नसल्याच्या प्रतिक्रिया आजही मतदार संघात आहेत. (Pune Politics)
पर्यायाने वळसेंचे राजकीय उत्तराधिकारी निकम यांनाच मतदार संघात मानले जात असताना त्यांना शहा-बेंडे-वळसे या त्रयींकडूनच विरोध प्रचंड वाढत गेला. अर्थात वरील तिघांची नावे ते आजही जाहीरपणे सांगतात. त्यातील पहिले म्हणजे वळसे पाटील यांचे परममित्र व उद्योगपती देवेंद्र शहा, दूसरे भिमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व तिसरे म्हणजे वळसेंचे पुतणे व भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील.
या त्रयींनी तालुक्यातील राजकारण खरे तर वळसे-पाटील यांच्या पश्चात उत्तम हाताळायला हवे होते. मात्र प्रत्येक ठिकाणी निकमांना डावलले जात असल्याच्या चर्चा संपूर्ण मतदार संघात सुरू असताना आता थेट बाजार समिती निवडणूकीतील त्यांचा उमेदवारीचा पत्ता कट करण्याचे काम झाले आणि निकम यांनी वळसे पाटील यांचा फोटो वापरुन या निवडणूकीच्या रणांगणात आपल्या सात सवंगड्यांसह उडी घेतली.निकमांची लढाई ही थेट त्यांनी मानलेल्या वळसे-पाटील या देवाच्या भाटांविरोधात आहे. त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाल्यास निकम आंबेगाव बाजार समितीवर आपली सत्ता आणू शकतात. (Dilip Walse Patil News)
दूसरीकडे राष्ट्रवादी पुरस्कृत, भाजपा-शिवसेना पुरस्कृत अशा दोन पॅनलमध्येच ही निवडणूक होईल अशी अटकल असताना निवडणूक ही निकमांच्या सहानुभूतीकडे वळाल्याने आंबेगावचे आगामी राजकारण वळसे यांच्या उत्तराधिकारी कोण हे ठरविण्यापर्यंत पोहचलेली आहे हे नक्की. एक मात्र नक्की या निवडणूकीत आता दस्तुरखुद्द वळसे पाटील यांचीच कसोटी लागणार आणि तिही त्यांच्या कट्टर चेल्यासोबत.
निकमांच्या बंडखोरी आगामी विधानसभेसाठी रंजकच...!
सन १९९० पासून आंबेगावचे आमदार म्हणून जेष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील आजही तितकेच सक्रीय आहेत. त्यांना हरविणे आजपर्यंत कुणालाच जमलेले नाही. मात्र त्यांच्या वयाचा विचार करता त्यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे पुतणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांचेपैकी एक वा त्यांची मुलगी पूर्वा वळसे-पाटील राहतील अशी चर्चा होते.
मात्र जनसंपर्क, शेतक-यांच्या प्रत्येक प्रश्नाची जाण, २४ तास उपलब्धता याबाबत निकम दिलीप वळसे-पाटील यांची मतदार संघातील संपूर्ण अनुपस्थिती भरुन काढीत असल्याने निकमांबाबत मतदार संघात मोठी सहानुभूती आहे. पर्यायाने आगामी २०२४ च्या निवडणूकीत स्वत: वळसे-पाटील निवडणूकीत उभे राहिले नाहीत तर निकम हमखास उतरणार हेच या निवडणूकीतील त्यांच्या बंडखोरीचे खरे सूत्र. अर्थातच या संपूर्ण घडामोडींकडे चाणाक्ष भाजपा लक्ष ठेवून नसेल तरच नवल.
वळसेंना बंडखोरीचे ग्रहण कायमच...!
सन २००४ मध्ये वळसेंचे जिवलग मित्र शिवाजीराव आढळराव यांना लोकसभेत जावू न देण्याचे राजकारण वळसेंचे अंगलट आले आणि आढळराव यांची बंडखोरी झाली. सन २०१४ मध्ये निकमांइतकेचे गळ्यातले ताईत राहिलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजे उपाध्यक्ष अरुण गिरे यांची बंडखोरी झाली. मधल्या काळात कात्रज संघाचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हिंगे हेही गिरे यांचेसोबत जाण्याची कुणकुण राहिली. आता तर थेट निकम यांचेकडूनच बंडखोरी झाल्याने वळसेंसाठी ही बंडखोरी सोपी राहणार नाही. कारण त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ठामपणे एकाचेही नाव पुढे दिसत नसल्याने सन २००४ पासून वळसे-पाटील यांना लागलेले बंडखोरीचे ग्रहण सन २०२४ मध्ये आंबेगाव-शिरुरमध्ये काय चमत्कार करणार त्याचीच लिटमस चाचणी म्हणजे आंबेगाव बाजार समितीची २८ तारखेची निवडणूक म्हणावी लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.