Dilip walse Patil, Dilip Mohite and Shivajirao Adhalrao Patil
Dilip walse Patil, Dilip Mohite and Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

Pune Politics : एकमेकांवर तोंडसुख घेणारे दिलीप मोहिते-आढळराव पाटील रंगले हास्यविनोदात!

डी. के. वळसे पाटील

मंचर (जि. पुणे) : शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांच्यातून एरवी विस्तवही जात नाही. एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या या दोन नेत्यांतील संबंध सर्वश्रूत आहेत. मात्र, जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर येथील लग्न समारंभात शुक्रवारी (ता. ७ एप्रिल) हे दोन्ही नेते एकमेकांशी शेजारी बसून मनसोक्त गप्पागोष्टी करत हेाते, तसेच हास्यविनोदातही रंगले होते. त्याच व्यासपीठावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) हे होते. मात्र, मोहिते-आढळरावांमधील हास्यविनोद पाहून वऱ्हाडीमंडळी अचंबित झाली हेाती. (Dilip walse Patil, Dilip Mohite and Shivajirao Adhalrao Patil came on the same platform)

आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव यांचे चिरंजीव अभिजित यांच्या विवाहाप्रसंगी श्री क्षेत्र ओझर येथे आमदार अतुल बेनके, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे, देवेंद्र शहा, गणपतराव फुलवडे, देवदत्त निकम, किसनराव उंडे, संजय काळे, बाळासाहेब बेंडे, सत्यशील शेरकर यांच्यासह राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

वळसे पाटील व मोहिते व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसले होते. त्यानंतर आलेले आढळराव पाटील नेमके कुठे बसणार, याविषयी उपस्थितींमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. पण आमदार मोहिते यांच्याच शेजारी आढळराव पाटील बसले. त्यानंतर तिघांमध्येही गप्पा सुरु झाल्या. हास्य विनोदानंतर चर्चा अधिकच फुलल्याचे चेहऱ्यांवर दिसत होते. त्याचवेळी आढळराव हे मोहिते यांना काहीतरी म्हणाले. त्यानंतर मोहिते यांनी काही क्षणातच मोबाईल ओपन करून पोस्ट दाखवण्यास सुरुवात केली. आढळराव पाटील एकाग्रतेने पोस्ट पाहत होते. नेमकी काय पोस्ट होती, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

खेड तालुका पंचायत समितीच्या जागेबाबत मोहिते व आढळराव यांच्यामध्ये टोकाच्या वादाच्या फैरी झडल्या होत्या. अगदी शिवसेनेचे खासदार संजय राऊत खेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मोहिते यांना खरपूस शब्दांत सुनावले होते. तो वाद संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता.

वधू-वराला शुभेच्छा देताना आढळराव म्हणाले की, लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून प्रशस्त सभागृह बांधले आहे.” हा धागा पकडून वळसे पाटील म्हणाले की, माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या नजरेतून ओझरला प्रशस्त सभागृह उभे राहिले आहे. अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारातही अत्याधुनिक सुविधा असलेल्या सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे सांगून वळसे पाटलांनी आढळरावांकडे कटाक्ष टाकला आणि पुढे म्हणाले की, आढळराव पाटील, लांडेवाडीचे सभागृह अजून मला पाहायला मिळाले नाही. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.

या वेळी वळसे पाटील यांच्या पत्नी किरण, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शैलजा शिवाजीराव ढोबळे व आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना यांच्यातही प्रदीर्घ कालावधीनंतर गप्पा झाल्या.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा या भागात संपर्क कमी झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून निर्माण होत असलेला जिव्हाळा, त्यात आमदार दिलीप मोहिते यांचीही भर पडली आहे. त्यामुळे खेड व आंबेगाव तालुक्याचे राजकीय सूत जुळत चालल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT