Pimpri News: राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर दोन्ही गटांनी नव्याने पक्षबांधणीबरोबर आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांचा एकेकाळचा बालेकिल्ला व प्रिय शहर पिंपरी-चिंचवड आपल्या रडारवर घेतले आहे. तेथे विधानसभेला आपले खाते खोलण्याची जोरदार तयारी आतापासून त्यांनी सुरू केली आहे.
उद्योगनगरीतील तीनपैकी पिंपरी राखीव या मतदारसंघावर अधिक लक्ष्य शरद पवार गटाने केंद्रित केले आहे. तेथे अजित पवार गटात गेलेले अण्णा बनसोडे आमदार आहेत. तेथे आपला आमदार करण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे विधानसभेला तेथे होणारी 'आघाडी' विरुद्ध 'महायुती' अशी लढत ही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतच होईल, अशीच चिन्हे दिसत आहेत.
कारण 'महायुती'कडून बनसोडे हे अजितदादांचे खंदे समर्थक आमदार हेच पुन्हा उमेदवार असतील, तर शरद पवार गटाकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर या इच्छुक असून, तयारीलाही लागल्या आहेत. गतवेळी २०१९ ला शिलवंत यांना राष्ट्रवादीने आपली उमेदवारी जाहीर केली, पण अर्ज भरायला काही तास राहिले असताना ती बनसोडेंना देण्यात आली होती.
या वेळी त्या पुन्हा जोमाने कामाला लागल्या आहेत. गत टर्ममधील पिंपरी महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ३७ नगरसेवकांपैकी त्या एकमेव आहेत, ज्य़ांनी मूळ पक्ष सोडलेला नाही. शरद पवारांबरोबर कायम राहिल्या आहेत. म्हणून त्यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वेळी पिंपरीतून तयारीत राहण्यास सांगितल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून आतापासून त्यांनी ती सुरू केली आहे.
पिंपरीत बनसोडेंच्या अगोदर २०१४ ला शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार आमदार होते. तेही पक्षफुटीनंतर शिलवंतप्रमाणे मूळ शिवसेनेसोबत (उबाठा) राहिले आहेत. त्यामुळे तेही पिंपरीवर आघाडीत शिवसेनेकडून क्लेम करू शकतात. म्हणून शिलवंत यांनी आतापासूनच आघाडीत साखरपेरणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांचीही त्यांनी काल मुंबईत जाऊन विक्रोळीतील त्यांच्या घरी भेट घेतली.
तासभर त्यांच्याशी चर्चा केली. पुढील महिन्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचीही भेट घेणार आहे, असे त्यांनी `सरकारनामा`ला या भेटीनंतर सांगितले. स्पेसिफिक नाही, तर जनरल चर्चा या भेटीत झाली, असे शिलवंत म्हणाल्या.
पिंपरीतील मतदारांची मानसिकता आणि सध्याची स्थिती खासदार राऊत यांनी जाणून घेतली. ताकदीने लढावे लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच पिंपरीतच नाही, तर चिंचवड आणि भोसरी या उद्योगनगरीच्या इतर दोन विधानसभा मतदारसंघातही गाववाला आणि बाहेरचा हा मुद्दा खूप प्रभावी ठरतो. त्यावर प्रत्येक निवडणुकीत मतांचे राजकारण होते. त्यावर मार्ग काढावा लागेल, असा सल्ला राऊतांनी या वेळी शिलवंतांना दिला.
कोण उभे राहिल्याने फायदा होईल वा कोणी थांबायला पाहिजे, याचा कल त्यांनी जाणून घेतला. एक मात्र खरं आहे, की आघाडीतील हे दोन्ही पक्ष म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दुभंगल्याने त्यांची ताकदही पिंपरीत निम्मी झाली आहे. त्यामुळे उमेदवार त्यांच्यापैकी कोणाचाही असो, युतीविरुद्ध मोठी ताकद त्यांना लावावी लागणार आहे. कारण या वेळी महायुतीला अजितदादांचेही मोठे बळ मिळालेले आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.