Pune, 11 June : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना 25 हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळाले आहे. मताधिक्य मिळालेल्या गावांमध्ये भाजप नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने या महायुतीच्या नेत्यांच्या गावांमध्येही सुप्रिया सुळे यांना लीड मिळाले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha Constituency) अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) या एक लाख 58 हजार मतांच्या फरकाने निवडून आल्या आहेत. इंदापूर (Indapur) तालुक्यातील 148 गावांपैकी 121 गावांमध्ये सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले आहे.
तर अवघ्या 27 गावांत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या आघाडीवर राहिल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे वगळता महायुतीच्या सर्वच नेत्यांच्या गावांतून सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले आहे, हे विशेष.
माजी सहकार मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातही सुप्रिया सुळे यांना 409 मतांची आघाडी मिळाली आहे. या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना 2609, तर सुप्रिया सुळे यांना तीन हजार अठरा मते मिळाली आहेत. अजित पवार यांचे निकटवर्तीय तथा मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांच्या शेळगावमध्येही सुनेत्रा पवार यांना 2141 मते, तर सुप्रिया सुळे यांना 2553 मध्ये मिळाली आहेत. या शेळगावमध्येही 412 मतांची आघाडी सुळेंनी घेतली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे आणि जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या सराटी गावातही सुप्रिया सुळे यांना 680, तर सुनेत्रा पवार यांना 605 मते मिळाली आहेत. याठिाकणी सुळे यांना 75 मतांची आघाडी मिळाल्याचे दिसून येते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या रुई गावातही सुप्रिया सुळे यांना 80 मतांची आघाडी मिळाली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्या कळस गावात सुप्रिया सुळे यांना 1994 मते मिळाली आहेत, सुनेत्रा पवार यांना 1561 मते मिळाली आहेत. या गावात सुप्रिया सुळे यांना 430 मतांची आघाडी मिळाली आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांच्या लाखेवाडी येथेही सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा सुळे यांना 62 मते जास्त आहेत. सुळे यांना 1311, तर सुनेत्रा पवार यांना 1249 मध्ये लाखेवाडीत मिळाली आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांच्या हिंगणगावमध्ये सुप्रिया सुळे यांना 536, तर सुनेत्रा पवार यांना 220 मते मिळाली आहेत. या ठिकाणी सुळे यांना 310 मतांची आघाडी आहे.
भरणेंची अजितदादांना खंबीर साथ
महायुतीच्या नेत्यांमध्ये केवळ आमदार दत्तात्रय भरणे यांनीच आपल्या गावातून सुनेत्रा पवार यांना लीड दिला आहे. भरणे यांच्या अंथुर्णे आणि भरणेवाडी या गावांमध्ये सुनेत्रा पवार यांना आघाडी दिली आहे. त्यात अंथुर्णेमध्ये पवार यांना 1725 आणि 1334 मध्ये म्हणजे 388 मतांची आघाडी मिळाली आहे. भरणेवाडी येथे पवार यांना 1663 तर, सुळे यांना 1071 मते मिळाली आहेत, एकूणच 592 मतांची आघाडी ही सुनेत्रा पवार यांना आमदार भरणे यांच्या गावातून मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.