Solapur, 11 June : माढा लोकसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ४ हजार ४८२ मतधिक्य देण्यात महायुतीचे आमदार शहाजीबापू पाटील यशस्वी ठरले आहेत. मात्र, हे मताधिक्य आमदार पाटील यांचे की निंबाळकर यांच्या कामाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, या मताधिक्क्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांचाही दावा असू शकतो. त्यामुळे सांगोल्यातील मताधिक्य नेमके कोणाचे, अशी चर्चा रंगली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) हे सुमारे एक लाख 25 हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. या मतदारसंघातील माढा, करमाळा, माळशिरस या तालुक्यांमधून मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील फक्त सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघातून निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांना मताधिक्य मिळाले आहे. उर्वरित सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघातून निंबाळकरांना आघाडी आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगोला विधानसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना ८४ हजार ५५६ मते मिळाली, तर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ८९ हजार ३८ मते मिळाली आहेत. सांगोल्यातून निंबाळकरांना ४ हजार ४८२ मताधिक्य मिळाले आहे. महायुतीकडून आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत असे मातब्बर नेते सांगोल्यात निंबाळकरांसाठी काम करीत होते.
मोहिते पाटील यांच्यासाठी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ अनिकेत देशमुख आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील हे सुमारे 768 मतांनी विजयी झाले आहेत. किरकोळ मतांनी निवडून आल्याची खंत शहाजीबापू पाटील यांनी अनेक कार्यक्रमात बोलून दाखवली आहे, त्यामुळे लोकसभेला वाढलेले मताधिक्य हे शहाजीबापूंसाठी दिलासा देणारे ठरणार आहे.
माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यानंतर त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाची पुनर्बांधणी केली आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या सूत गिरणी, बाजार समिती, खरेदी विक्री संघ आदी सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करत शेकापची मजबूत बांधणी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाकडून डॉ. बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांची लढत ही आमदार शहाजीबापू पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत शहाजीबापूंनी लोकसभा निवडणुकीत सांगोल्यातून निंबाळकर यांना ४ हजार ४८२ मताधिक्य दिले आहे. ही गोष्ट शहाजीबापूंसाठी दिलासा देणारी आहे. मात्र, विधानसभेची गणितं यापेक्षा वेगळी असू शकतात. त्यामुळे हे मताधिक्य शहाजीबापू पाटील विधानसभेला कायम ठेवतील का, खरा प्रश्न आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगोल्यासाठी नीरा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले होते. तसेच, माण नदीही ऐन उन्हाळ्यात तुडुंब भरून वाहत होती. त्यामुळे शेतीसाठी सोडलेल्या पाण्याचा निवडणुकीतील मतदानावर परिणाम झालेला असू शकतो. तसेच शेकापमधील काही असंतुष्ट नेतेही निवडणुकीत भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सांगोल्यातून निंबाळकरांना मिळालेले लीड नेमके कोणाचे, अशी चर्चा सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.