Pune, 11 January : आमदार महेश लांडगे यांच्या नादाला कोणी लागू नये. माझ्या नादाला लागला तर बघून घेईन, अशी धमकी काहीजण देतात. अरे मी गेली 10 वर्षे तुमच्या नादाला लागलो आहे, तुम्ही माझे काय केलंय? ते आता तुम्ही महेश लांडगेंचं काय करणार आहात? असा सवाल करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवारांना डिवचले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची सभा झाली. त्या सभेत बोलताना आमदार पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर पुन्हा हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्यात 29 महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. पण, टीव्ही लावला तर पिंपरी चिंचवड महापालिकाच दिसेत. राष्ट्रवादीचे दुसरीकडे कुठे पॅनेल आहे की नाही माहिती नाही. त्यांचा पिंपरी चिंचवडवरच डोळा आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे आणि त्यांना ही कोंबडीच कापायची आहे, त्यामुळे ते उठसूठ पिंपरी चिंचवडमध्ये येतात आणि महेश लांडगेंवर टीका करण्याचा प्रयत्न करतात. अरे महेश लांडगे (Mahesh Landge) हा वाघ आहे, त्याला तुम्ही कितीही घेरलं, तर त्याने एकच पंजा मारला तर तुमचा कार्यक्रम होऊन जाईल. एवढी क्षमता त्यांच्यात पंजात आहे, असा इशारा पडळकर यांनी दिला.
ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. मी मुंबईहून येताना ते ऐकलं आहे. पिंपरी चिंचवडसाठी फडणवीस आणि लांडगे यांनी जे केले आहे, ते चाळीस वर्षे महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्यांना जमलेले नाही. त्यांनी आता आम्ही पुण्यात हे करू, पिंपरी चिंचवडमध्ये ते करू, अशा वल्गना करण्याची आवश्यकता नाही.
राज्याला फडणवीसांसारखे दूरदृष्टीचे नेतृत्व मिळाले आहे. ते चोवीस कॅरेटचं सोनं आहे, त्याला आपण जपलं पाहिजे. तरच महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होणार आहे. राज्यातील ४० शहरांत महाराष्ट्रातील ५० टक्के जनता राहते, तर २८ हजारच्या ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतीमध्ये जेवढी जनता राहते, तितकीच लोकं चाळीस शहरांत राहते, त्यातील चाळीस टक्के लोकं ही २९ महापालिका क्षेत्रात राहतात. या महापालिकांचा विकास व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्रीचा दिवस करत आहेत, असा दावा पडळकर यांनी केला.
ते म्हणाले, शहरं विकसित करण्यासाठी सरकार हजारो कोटी रुपयांचा निधी देत आहेत. त्यातील काही हजार कोटींचा निधी महेश लांडगे यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवडमध्ये आला आहे. सुमारे ८५० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ करण्याचे पुण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि महेश लांगडे यांनी केले आहे. तो शास्तीकर २०१२ ला कोणी लावला, त्या वेळी पुण्याचं पालकमंत्री कोण होतं. राज्यात सरकार कोणाचं होते, हे सर्वांना माहिती आहे.
महेश लांडगेंसारखा नेता तुम्हाला मिळाला आहे, त्यांना आपण जपलं पाहिजे. मी पाहतो की, तो दुसरा एक दादा, आपला एक दादा आणि तिकडच्या पार्टीत एक छोटा दादा आहे. तिकडं दोन दादा आहेत आणि आपल्याकडे एकच दादा आहे. आपल्या दादाची छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, प्रभू श्रीराम, हनुमान बाहेर निघतील, असे पडळकर यांनी नमूद केले.
ते म्हणाले, तिकडच्या दादाची छाती फाडली तर काय निघेल, तर ढापलेले १० ते १५ कारखाने, पुणे आणि पिंपरीतील सातबारे आणि भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे. त्यामुळे महेश लांडगेंच्या नादाला कोणी लागू नये.
जरा का घेशील भाजपशी पंगा; भरचौकात करीन नंगा
आम्हाला यात जायचं नव्हतं. आमची महायुती आहे. पण ते भाजपवर बोलायला लागले. भाजपवर त्यांनी काय स्टेटमेंट केलं हे तुम्ही बघितलंच असेल. अरे जरा का घेशील भाजपशी पंगा; भरचौकात करीन नंगा. ध्यानात ठेव बरं का, हा भाजप आहे बरं का? भाजपच्या नादाला लागू नका, असा इशाराही पडळकरांनी दिला.
‘तुम्हाला बारामतीमधला टॅंकर बंद करता आला नाही’
ते म्हणाले, पिंपरी-चिंचवडचा विकास करू म्हणतात, त्यांना माझं एकच आव्हान आहे, बारामतीत मी २०१९ ची निवडणूक लढवली होती. तालुक्यातील काही गावांना आजही पिण्याचे पाणी नाही. गेली ४० वर्षे तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात आहात. तुम्हाला बारामतीमधला टॅंकर बंद करता आला नाही. फडणवीसांनी तो बंद केला. तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये कशासाठी येता, काय इथं आहे.
‘महेश लांंडगे जनतेतून तयार झालेला नेता’
तो रोहित पवारही महेश लांडगेंवर बोलायला लागला आहे. लांडगे हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आलेला नाही. तो इथल्या लोकांनी तयार केलेला नेता आहे. तो घराणेशाहीतून आलेला नाही. पिंपरी चिंचवडचा विकास करण्याची ताकद लांडगे यांच्यात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.