Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : ‘गेली ३५ वर्षांत ह्या अजित पवारला कोणी पोच मागितली नाही; हा गडी मला पोच मागतोय’

Vijaykumar Dudhale

Pune, 09 May : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरातील पोटचाऱ्यांना पाणी सोडण्यासंदर्भात भगवानराव शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दोन प्रतींमध्ये निवेदन दिले होते. त्याबाबत त्यांनी विचारताच ‘पोच घेण्यासाठी एक प्रती जोडली आहे,’ असे सांगण्यात आले. त्यावर अजितदादांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिले. व्वा..ऽऽ अजित पवारांची पोच घ्यायला निघाले आहेत. एवढा गैरविश्वास. गेल्या ३५ वर्षांत मला कोणी पोच मागितली नाही. हा गडी मला पोच मागतोय. तुलाच पोचवून टाकतील, अशा शब्दांत पोच मागणाऱ्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दटावले.

शिरूर तालुक्यातील केंदूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्या सभेत अजित पवारांनी निवेदनाची पोच मागणाऱ्या कार्यकर्त्याला सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवेदनाची पोच मागणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवार खडे बोल सुनावत असतानाच उत्साही कार्यकर्त्यांनी एकच वादा...अजितदादा अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर एकच वादा नको, आपलं घड्याळ घड्याळ.... तुमचं काम केल्यावर वादा करा, असेही अजित पवारांनी त्या कार्यकर्त्याला सांगितले.

अजित पवार म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवा. मी शब्दाचा पक्का आहे. मी तुमची कामं करून देणार. मी असा तसा मोकळा बसणार नाही. पण, तुमच्या लोकांनीही माझा पिच्छा पुरवायचा. मी प्रत्येक आठवड्याला सर्किट हाऊस किंवा कॉउन्सिल हॉलला असतो. त्यामुळे सर्व अधिकारी तेथे येतात. मंत्रालयातसुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार दिवस असतो. त्यामुळे सार्वजनिक कामांचा पाठपुरावा करायला या. बारा गावच्या प्रश्नासंदर्भात देवेंद्र फडणवीस मंजुरी देतील आणि माझ्या हातात तिजोरीची चावी आहे, त्याला काय नियमाने लागणारी रक्कम दिली जाईल. पण तुम्हीही माझं ऐकलं पाहिजे. ताकाला जाऊन मोगा लपवायचं, हा आपला धंदा नाही. आपलं रोखठोक आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू, पण, तुम्हीही आम्हाला मदत केली पाहिजे.

मला दम दिलेला आवडत नाही : अजित पवार

याच निवेदनात पाणी न सोडल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्याचाही पवारांनी समाचार घेतला. कशाला उग्र, लगेच उग्र आंदोलन. टेलला जे पाणी सोडलं आहे, त्यांचं झालं की तुम्हाला पाणी सोडण्यात येईल. कशाला उग्र आणि फिग्र आंदोलन करता. मला दम दिलेला आवडत नाही. तुम्ही गोड बोलून काम करून घ्या ना. मी आहे ना तयार. मी कामाचा माणूस असून असा तसा नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT