Vijay Shivtare ajit pawar sarkarnama
पुणे

Vijay Shivtare On Ajit Pawar : विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम, अजितदादांवर केली आगपाखड

Vijay Shivtare Marathi News : "मी अजित पवारांना माफ केलं, पण...", अशी टीकाही शिवतारेंनी केली.

Akshay Sabale

पुणे : 13 मार्च | लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवारांना अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांना रोखण्यासाठी सत्ताधारी भाजप, मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट), उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे. त्यातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामतीतून निवडणूक रिंगणात उतरविण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. परिणामी, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने-सामने येण्याची शक्यता असतानाच; शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) बारामतीतून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

आपली भूमिका मांडताना शिवतारेंनी अजितदादांच्या राजकारणावर आगपाखड केली. पुण्यात विरोधकांना प्रामुख्याने मित्रपक्षांना अजित पवारांनी ( Ajit Pawar ) मोठे होऊ दिले नसल्याचे सांगून, पुढच्या निवडणुकीत त्याचा बदलाच घेणार असल्याचेही शिवतारेंनी स्पष्ट केले. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांचे राजकारण संपविण्याची भूमिका अजित पवारांनी ठेवल्याचा आरोपही शिवतारेंनी केला. शिवतारेंच्या या पवित्र्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढणार आहे.

त्यापलीकडे जाऊन महायुतीतही मिठाचा खडा पडणार असल्याचे स्पष्ट आहे. अजित पवारांचा बदला घेण्याची भाषा करीत शिवतारेंनी ( vijay Shivtare ) महायुतीच्या विरोधात नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार हा राजकारणाचा भाग"

विजय शिवतारे म्हणाले, "बारामती मतदारसंघ कुणाचा सातबारा नाही. त्यामुळे पवार..पवार करण्याऐवजी निश्चितच आपण लढलं पाहिजे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार हा राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक हितासाठी प्रचार केला नव्हता."

"अजित पवारांनी उर्मट भाषा केली"

"पण, अजित पवारांनी सभ्येतीची नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावती रुग्णालयात दाखल होतो. मी रूग्णवाहिकेच्या माध्यमातून प्रचार केला. तेव्हा अजित पवारांनी पालखीतळावरून सांगितलं, 'मरायला लागला आहे, तर कशाला प्रचार करताय? लोकांची सहानुभूती घेण्यासाठी खोटं बोलत आहात.' माझ्या गाडीच्या नंबरपर्यंत खालच्या स्तरावर अजित पवार आले. राजकारणात निवडून आणण्यासाठी सकारात्मक प्रवृत्ती असावी. तेव्हा, अजित पवारांनी उर्मट भाषा केली होती," अशी टीका शिवतारेंनी केली.

"अजित पवारांची गुर्मी तशीच"

"मी अजित पवारांना माफ केलं आहे. महायुतीत आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली. पण, तरीही अजित पवारांची गुर्मी तशीच होती. दौंडमधील नागरिकांनी सांगितलं की अजितदादा उर्मट आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंना मतदान करणार आहे," असं शिवतारेंनी सांगितलं.

"अजित पवारांची विश्वाससार्हता संपली"

"पुरंदरची लोक बदला घेण्याबद्दल बोलत आहेत. पण, नियती बदला घेईन. पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर अजित पवारांची विश्वाससार्हता संपली होती. त्यामुळे बारामती मतदारसंघातील घराणेशाही आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना निवडणुकीचा हक्क मिळण्यासाठी मी लढणार म्हणजे लढणार," असा निर्धार शिवतारेंनी व्यक्त केला.

"आम्ही पुण्याचे मालक अशी अजित पवारांची मानसिकता"

"पवार विरुद्ध बारामतीतील सर्वसामान्य माणूस अशी ही लढाई असणार आहे. सर्वांना पवारांनी त्रास दिला आहे. भोरचे अनंतराव थोपटे 1999 मध्ये मुख्यमंत्री झाले असते. पण, त्यांना पाडण्यात आलं. संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत महाविकास आघाडीत मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष अजित पवारांनी होऊ दिलं नाही. आम्ही पुण्याचे मालक अशी अजित पवारांची मानसिकता आहे. लोकसभेला हर्षवर्धन पाटलांकडून मतदान करून घ्यायची आणि विधानसभेला त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्यात आले. अशा प्रकारची फसवेगिरी करण्यात आली. जन्मजात लोकांना फसवणे हा यांचा अधिकार आहे," असा हल्लाबोलही शिवतारेंनी अजित पवारांवर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT