Sharad Pawar  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : शरद पवारांचा पुन्हा एकदा 'मास्टरस्ट्रोक'; अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांची राष्ट्रवादीत एन्ट्री!

Deepak Kulkarni

Pune News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, राज्यभरातल्या अनेक लढतींचे चित्रदेखील स्पष्ट झाले आहे. याचवेळी एकमेकांवर कुरघोडी, शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. यात शरद पवारांनीदेखील आपला आजपर्यंतचा राजकीय अनुभव पणाला लावत महायुतीचा बंदोबस्त करण्याची तयारी केली आहे. आता पवारांनी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांनाच आपल्या पक्षात आणले आहे.

अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषणसिंह होळकर (Bhushan Sinh Holkar) हे उद्या (ता.18) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर शरद पवार मोठी जबाबदारी देण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांचं नाव शरद पवार Sharad Pawar गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असणार आहे.

जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरून मोठा वाद काही दिवसांपूर्वीच उफाळून आला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या हस्ते होत असलेल्या या लोकार्पणाला होळकर कुटुंबीयांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. तसेच भूषणसिंह यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप करतानाच होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबीयांचा डोळा असल्याचे म्हटले होते. पण आता त्याच भूषणसिंह होळकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP Sharad Pawar Group) आणण्यात शरद पवार यशस्वी ठरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीत पाठिंबा वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. पू्र्वीच्या राष्ट्रवादीत अजित पवारांमुळे दुखावलेल्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेण्यावर पवारांनी भर दिला आहे. राजकारणापासून दूर गेलेले पण पूर्वाश्रमीचे सहकाऱ्यांनाही पवारांनी कामाला लागण्याचे आदेश दिलेत. यासह पवारांनी अजित पवारांच्या खास शिलेदारांनाही गळ घालण्याचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे. माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि अजितदादांचे निकटवर्तीय बाळासाहेब तावरे यांची पवारांची भेट घेतली आहे.

माळेगाव येथील निवासस्थानी जात पवारांनी बाळासाहेब तावरे यांच्याशी चर्चा केली होती . तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते आहे. त्यामुळे या भेटीने बारामतीच्या राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तावरेंसह माळेगावातील राजकीयदृष्ट्या ताकद असलेल्या बुरुंगले, सस्ते कुटुंबीयांशीही पवारांनी चर्चा केली. पवारांनी चंद्रराव तावरे, अनंत थोपटे यांच्यासह बारामतीतही पवार कुटुंबीयांचे आजतागायतचे विरोधक राहिलेल्या काकडे कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT