Pune Mahayuti Sarmarnama
पुणे

Pune Mahayuti Melava : मनोमिलन तर दूरच, पण रुसवे-फुगवे वाढले; महायुतीत बॅनरवरून वाद

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar : पुण्यातील महायुतीच्या मेळाव्यात अजित पवार करणार मार्गदर्शन

Chaitanya Machale

Pune Political News: लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीच्या विरोधातील व्रजमूठ अधिक कडक करण्यासाठी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचे पदाधिकारी एकत्र आले. शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे, यासाठी मेळाव्याचे नियोजन आहे. हा मेळावा रविवारी, 14 जानेवारीला होणार आहे. मात्र त्यापूर्वीच महायुतीत सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रूसवे-फुगवे सुरू झाले आहेत.

महायुतीत सर्व पक्ष सहभागी असतानाही भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), तसेच शिवसेनेच्या नेत्यांचे फोटोंना वेगळे स्थान आणि इतर पक्षांच्या नेत्यांना वेगळे स्थान देण्यात आले आहे. यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यावर काही नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी देखील व्यक्त केली आहे. यावर महायुतीतील वरीष्ठ नेते कसा तोडगा काढणार, याकडे लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनोमिलन करण्याचा निर्धार महायुतीत सहभागी झालेल्या पक्षांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय (ए), शिव संग्राम आणि मित्र पक्षांचा पुणे जिल्ह्याचा पहिल्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातील डीपी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे. राज्यातील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांचे संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हा मेळावा होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी या पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत या मेळाव्याची माहिती दिली. भाजपचे राज्य सरचिटणीस आणि पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे, आरपीआयचे परशुराम वाडेकर, मंदार जोशी यांच्यासह शिवसंग्राम आणि इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेल्या बँनरवर ठराविक पक्षाच्या नेत्यांचे फोटो मोठ्या आकारात तर इतर मित्र पक्षांच्या नेत्यांचे फोटो छोट्या आकारात लावण्यात आल्याने काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

'आमचा पक्ष लहान असला तरी काय झाले, जसे तुमचे नेते आहेत, तसेच आमच्याही मनात आमच्या पक्षाच्या नेत्यांचे स्थान मोठे आहे. आपण एकत्र आहोत, असे दाखविता मग बँनरवर फोटो लावताना दुजाभाव का करता?' अशी विचारणा काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या बैठकीत केली. या सर्व प्रकारामुळे मेळावा होण्यापूर्वीच आता छोट्या-छोट्या गोष्टींवरून रूसवे-फुगवे सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

याबाबत महायुतीचे समन्वयक म्हणून जबाबदारी संभाळणारे भाजपचे पदाधिकारी संदीप खर्डेकर म्हणाले, 'महायुतीमध्ये सात ते आठ पक्ष एकत्र आलेले आहेत. प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याची काही भूमिका होती. त्यावर चर्चा झालेली आहे. आमच्या नेत्यांचे फोटो मोठे लावा यावरून कोणत्याही पदाधिकाऱ्याची नाराजी नाही. त्यांच्या काही सूचना होत्या. त्या सूचना ऐकून घेण्यात आलेल्या आहेत. त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहचविल्या असून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.'

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT