Pune Corporation water supply sarkarnama
पुणे

Pune Corporation News : मुबलक पाण्यासाठी आजही पुणेकरांची वणवण! पाच वर्षांत पाणीपट्टी झाली दुप्पट

Chaitanya Machale

पुण्यातील नागरिकांना समान पाणी मिळण्यासाठी सुरू केलेली महापालिकेची ( Pune Corporation ) 'समान पाणीपुरवठा योजना' अद्यापही पूर्ण झालेली नाही. नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी मोठा गाजावाजा करत महापालिकेनं 2017 मध्ये या योजनेचं काम सुरू केलं. पण, सहा वर्षे उलटून गेल्यानंतरसुद्धा योजनेचं काम प्रलंबित असल्याचं समोर आलं आहे.

पुणे शहराचा विकास हा चारही दिशांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. वाढती लोकसंख्या शहरात नोकरीनिमित्त येणाऱ्या नागरिकांचे वाढते प्रमाण, यामुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पुणे शहराचा आकार हा बशीसारखा असल्याने काही भागात मुबलक पाणीपुरवठा, तर काही भागात मात्र अपुरा पाणीपुरवठा अशी स्थिती आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील सर्व भागातील नागरिकांना पुरेशा दाबाने आणि समान पाणी मिळावे, यासाठी महापालिका ( Pune Corporation ) प्रशासनाने समान पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सहा वर्षांपूर्वी 2016 -17 मध्ये '24 बाय 7' पाणीपुरवठा या नावाने या योजनेची सुरुवात झाली. मात्र, शहरातील प्रत्येक भागाला 24 तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने तसेच राजकीय पक्षांनी केलेल्या विरोधानंतर या योजनेचे नामकरण 'समान पाणीपुरवठा' असे करण्यात आले. पुढील 30 वर्षांचा शहराचा विस्तार आणि शहराची लोकसंख्या 50 लाखांहून अधिक गृहीत धरून या योजनेची आखणी करण्यात आली आहे. शहरात पाणीपुरवठा करताना होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात आले होते. ही योजना सुरू झाल्यानंतर तब्बल 40 टक्के पाण्याची गळती थांबेल, असा दावा करण्यात आला होता.

ही योजना तब्बल 2515 कोटी रुपयांची असून, या योजनेला यापूर्वी दोन वेळा मुदतवाढदेखील देण्यात आलेली आहे. मार्च 2024 मध्ये ही योजना कार्यान्वित होईल, असा दावा प्रशासनाने केला होता. पण, अजूनही याचे काम अर्धवट असल्याचे समोर आल्याने या योजनेसाठी आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील सर्व नागरिकांना पुरेसे आणि समान पाणी मिळणार असल्याचे स्वप्न दाखवीत पालिकेने नागरिकांकडून प्रत्येक वर्षी पाणीपट्टीमध्ये पंधरा टक्के दरवाढ प्रस्तावित केली होती. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांकडून ही रक्कम वसूलदेखील केली जात आहे.

या योजनेच्या नावाखाली पुणेकरांची पाणीपट्टी पहिल्या पाच वर्षांत आता दुप्पट झाली आहे. मात्र, अद्यापही अनेक भागातील नागरिकांना पुरेसे पाणी अजूनही मिळालेले नाही. यापूर्वी मुदतवाढ देऊनदेखील या योजनेचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार तरी कधी? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या योजनेतील बहुतांश कामे पूर्ण होण्यासाठी अजून सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

अजून सव्वा लाख पाण्याचे मीटर बसविणे बाकी

समान पाणीपुरवठा योजनेसाठी शहरातील विविध भागात 83 पाण्याच्या टाक्या उभारणे, सोळाशे किलोमीटरची नवीन पाइपलाइन टाकणे, दोन लाख 80 हजार पाण्याचे मीटर बसविणे अशी कामे केली जाणार आहेत. या योजनेसाठी महापालिकेने 200 कोटी रुपयांचे कर्जदेखील घेतलेले आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांत या योजनेअंतर्गत महापालिकेने 850 किलोमीटरची नवीन पाइपलाइन टाकली असून, केवळ 51 पाण्याच्या टाक्या उभारलेल्या आहेत, तर एक लाख 80 हजारपर्यंत पाण्याचे मीटर बसविले असून, एक ते सव्वा लाख मीटर बसविणे शिल्लक आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT