Ajit Pawar-NCP-Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Daund Politics : दौंडला 20 वर्षांपासून थांबली घड्याळाची टिकटिक; रंजना कुल ठरल्या राष्ट्रवादीच्या शेवटच्या आमदार

Vijaykumar Dudhale

Pune, 08 June : बारामती लोकसभा निवडणुकीत ‘तुतारी’वर निवडणूक लढविणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना दौंड विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ३३७ मताधिक्क्य मिळाले आहे. मात्र, मागील दोन निवडणुकांत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या सुळे यांना मताधिक्क्य मिळाले नव्हते. त्याचप्रमाणे या वेळी घड्याळावर निवडणूक लढविणाऱ्या सुनेत्रा पवार यांनाही दौंडमधून पिछाडीवर राहावे लागले आहे. बारामतीशेजारी असूनही गेल्या २० वर्षांपासून घड्याळ चिन्हाचा उमेदवार दौंडमधून विधानसभेला निवडून आला नाही, तर लोकसभेला २००९ पासून मताधिक्क्य मिळालेले नाही.

बारामती लोकसभा निवडणुकीत दौंड विधानसभा मतदारसंघातून ( Daund Assembly Constituency) सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांना ९२ हजार ०६४ मते, तर सुनेत्रा पवार यांना ६५ हजार ७२७ मते मिळाली आहेत. सुळे यांना दौंडमधून २६ हजार ३३७ मताधिक्क्य मिळाले आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत सुळे यांच्या विरोधात दौंडकरांनी कौल दिला होता. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कांचन कुल (Kanchan Kul) यांना ७०५३ चे मताधिक्क्य मिळाले होते, तर २०१४ च्या निवडणुकीत महादेव जानकर यांना दौंडच्या जनतेने २५ हजारांचे मताधिक्क्य दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दौंड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) घड्याळ चिन्हावर २००४ मध्ये आमदार निवडून आला आहे. त्यानंतर दौंडमध्ये विधानसभा आणि लोकसभेला घड्याळ चिन्ह चाललेले नाही. घड्याळ चिन्हावर श्रीमती रंजना कुल या २००४ मध्ये निवडून आलेल्या शेवटच्या आमदार आहेत. त्यानंतर दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होऊ शकलेला नाही.

रंजना कुल यांच्यानंतर २००९ मध्ये राहुल कुल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणुकीला उभे होते. त्या निवडणुकीत रमेश थोरात हे अपक्ष निवडणूक लढले. दौंडकरांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे राहुल कुल यांना नाकारले होते, त्यावेळी अपक्ष निवडणूक लढविणारे रमेश थोरात यांना दौंडच्या जनतेने निवडून दिले होते. लोकसभेच्या निवडणुकीत मात्र बाहेरून आलेल्या कांता नलावडे यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना पसंती दिली होती.

अपक्ष निवडून आलेले रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत २०१४ ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ्याच्या चिन्हावर लढवली. राहुल कुल हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी दौंडकरांनी रासपकडून निवडणूक लढविणारे कुल यांना निवडून दिले होते. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणारे थोरात यांचा त्यावेळी पराभव झाला होता.

तोपर्यंत घड्याळ आणि दौंडचे विळ्या-भोपळ्याचे नाते राहुल कुल यांच्या बहुधा लक्षात आले असावे. तसेच, राज्यातील राजकीय हवा लक्षात घेऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात रमेश थोरात यांनी राष्ट्रवादीकडून लढले होते. मात्र, त्याही निवडणुकीत ७४६ मतांनी थोरात यांचा निसटता पराभव झाला होता.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीतही दौंडमधून जानकर यांना २५ हजारांचे मताधिक्क्य मिळाले होते. म्हणजे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या सुळे यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी बारामतीतील मताधिक्क्याने त्यांना तारले होते.

बारामतीत २०१९ च्या निवडणुकीत राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी भाजपकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेच्या आखाड्यात उतरल्या होत्या. त्या निवडणुकीतही घड्याळावर लढणाऱ्या सुळे यांना दौंडमधून लीड मिळू शकले नव्हते. त्या वेळी कांचन कुल यांना ७०५३ चे मताधिक्क्य मिळाले हेाते.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घड्याळाकडून निवडणूक लढवली होती, तर तुतारीवर सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवली होती. मागील दोन निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी दहा वर्षांनंतर दौंडमध्ये मताधिक्क्य घेतले. मात्र सुनेत्रा पवार यांना लीड मिळू शकले नव्हते.

दौंडमधून मागील २० वर्षांपासून विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येऊ शकलेला नाही. राष्ट्रवादीच्या चिन्हावर श्रीमती रंजना कुल ह्या निवडून आलेल्या शेवटच्या आमदार आहेत. त्यानंतर दौंडमध्ये राष्ट्रवादीचा आमदार होऊ शकलेला नाही. तसेच लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला गेली ११ वर्षांपासून मताधिक्क्य मिळू शकलेले नाही. शेवटी तुतारीवर लढणाऱ्या सुप्रिया सुळेंना या निवडणुकीत मताधिक्क्य मिळाले आहे. त्यामुळे दौंडमध्ये घड्याळ का चालत नाही, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही पडलेला असू शकतो. आता ते यावर काय तोडगा काढतात, हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT