Ajit Pawar - Sharad Pawar Sarkarnama
पुणे

NCP Crisis: अजितदादांचा दबदबा असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये पवारांना आता 'हे' शिवधनुष्य पेलावे लागणार

NCP Crisis : ...तसेच हे मोठे आव्हान ऐन लोकसभा निवड़णुकीच्या तोंडावर त्यांना पेलावे लागणार आहे.

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ हे त्यांचे निवडणूक चिन्ह पक्षातून फुटुन बाहेर पडलेल्या अजित पवार गटाचे असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता.6) दिला.त्याचे तीव्र पडसाद शरद पवार राष्ट्रवादीत उमटले असून त्यांचे पदाधिकारी संतापले आहेत. दुसरीकडे अजित पवार गटाने उद्योगनगरीत जल्लोष न करता शांत राहण्याची खबरदारी घेतली आहे.

दरम्यान,पक्ष आणि चिन्हही गेल्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला आता पुन्हा शून्यातून सुरवात आपल्या बालेकिल्यातूनच म्हणजे पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातून करावी लागणार आहे. तसेच हे मोठे आव्हान ऐन लोकसभा निवड़णुकीच्या तोंडावर त्यांना पेलायचे आहे. कारण उद्योगनगरीतील पक्षाचे एकमेव आमदार, पदाधिकारी,माजी नगरसेवक थोडक्यात बहुतांश पक्ष हा अजितदादांबरोबर गेलेला आहे.तर,राहिलेल्यांनी नवे पक्ष कार्यालय थाटून नुकतीच नव्याने पक्षबांधणी सुरु केली होती.

मात्र,आता त्यांना आपल्या नव्या कार्यालयात पुन्हा बदल करावा लागणार असून तेथील घड्याळ हे चिन्ह हटवावे लागेल.तर, नवे निवडणूक चिन्ह तेथे टाकून ते जनतेत अल्पावधीत रुजविण्याचे शिवधनुष्य त्यांना उचलावे लागणार आहे.

खासदार कोल्हेंची शब्दांतून नाही,तर...

शरद पवार गटाचे शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केले. शिवाजीमहाराजांना औरंगजेबाने दिल्लीला भेटीला बोलावून कपटाने कैद केले होते.हा आपल्या स्वराज्यरक्षक संभाजीराजेंच्या प्रयोगातील ऐतिहासिक प्रसंगाचा व्हिडीओ दिल्लीचा दगा महाराष्ट्राला नवा नाही,कालही...आजही!!!या नावाने सोशल मीडियात शेअर करत खासदार कोल्हेंनी शब्दांतून नाही,तर चलचित्रातून नेमके भाष्य कालच्या आयोगाच्या निर्णयावर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार युवक राष्ट्रवादी आक्रमक

दरम्यान,पिंपरी-चिंचवड शरद पवार युवक राष्ट्रवादीने कालच सायंकाळी पिंपरी चौकात निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणा दिल्या.आयोगाचा निर्णय हा लोकशाहीची हत्या करणारा असून पक्ष व चिन्ह हा रडीचा डाव खेळून हिसकावून घेतला आहे,असे शेख यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT