Pune Political News : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा गेल्या २२ महिन्यांचा प्रशासकीय कारभार वादग्रस्त ठरताना दिसत आहे. या कालावधीत तेथील कर्मचारी व अधिकारी हे अधिक बेशिस्त झाल्याचे वेळोवेळी समोर आलेले आहे. त्यांच्यावर वचक नसल्याने पालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचे यापूर्वी स्पष्ट झालेच आहे.
आता मात्र गुन्हेगारी कारवायांतही सहभागी महापालिकेचे रेकॉर्डब्रेक सात कर्मचारी,अधिकारी गेल्यावर्षी सस्पेंड झाले. हे सत्र नव्या वर्षात सुरूच राहिले असून पहिल्याच महिन्यात वनेश प्रल्हाद परदेशी हा आणखी एक कर्मचारी नुकताच घरी गेला. त्याच्यावर चक्क खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे.
सभागृहाची मुदत संपल्याने पिंपरी महापालिकेत १४ मार्च २०२२ पासून प्रशासकांचा कारभार सुरू आहे. त्यात आयुक्तांचा वचक राहिला नसल्याने कारभार बेशिस्त झालेला आहे. पदाधिकाऱ्यांअभावी प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी बेबंदशाही सुरू आहे. त्यातून काही पालिका कर्मचारी हे लाचखोरीत अडकले. त्यात त्यांचे सस्पेन्शन झाले, तर फसवणूक व इतर फौजदारी गुन्ह्यांत काही सापडल्याने त्यांनाही घरी बसावे लागले.
गेल्या महिन्यात ५ तारखेला पालिकेतील सहायक आरोग्याधिकारी राजेश भाट (वय ५४) यांना त्यांच्या केबिनमध्ये घुसून मारहाण करण्यात आली. यात त्यांच्याच कार्यालयातील सफाई कामगार शंकर मुरलीधर सोनवणे (वय ३२) याच्यासह भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे यांचे पती संतोष लांडगे आणि आणखी एकाचा सहभाग होता. त्यात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने सोनवणेला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह (Shekharsingh) यांनी १५ डिसेंबरला घरचा रस्ता दाखवला.
पहिला सफाई कामगार निलंबित होऊन महिना व्हायच्या आत परदेशी या दुसऱ्या सफाई कर्मचाऱ्यावर हीच कारवाई नुकतीच प्रशासकांनी केली. त्याची खातेनिहाय चौकशी लावली. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात पालिका प्रशासनाच्या दृष्टीने खळबळजनक झाली. धक्कादायक बाब म्हणजे खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा परदेशीवर आरोप आहे.
पुणे (Pune) ग्रामीणमधील जेजुरी पोलिस ठाण्यावर गेल्यावर्षी ८ जुलैला खून, खुनाचा प्रयत्न, दंगल करणे, जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध नोंद झाला. त्यात त्याला लगेच दुसऱ्या दिवशी अटकही झाली. सध्या तो येरवडा जेलमध्ये आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
९ जुलै २०२३ ला अटक झाल्यानंतर त्याच महिन्यात काही दिवसांत परदेशीचे निलंबन हे कायद्यानुसार होणे आवश्यकच होते. परंतु, त्याला चक्क पाच महिने उशीर झाला. या महिन्यात १० तारखेला निलंबनाची ही कारवाई झाली. त्याचे बिल पालिका प्रशासनाने आता पोलिस खात्यावर फाडले आहे. त्यांनी आपला रिपोर्ट खूपच उशिरा म्हणजे गेल्या महिन्याच्या १६ तारखेला सादर केल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
दुसरीकडे हा अहवाल मिळूनही अॅक्शन घ्यायला पालिकेने एक महिना घेतला. त्यातून त्यांचा लालफितीचा ढिसाळ कारभारच समोर आला. त्यांच्या सस्पेन्शनच्या उशिराच्या कारवाईनंतर आता त्यांना थोडीशी का होईना जाग आली आहे. त्यामुळे परदेशीच्या डिपार्टमेंटल चौकशीचे चार्जशीट १५ दिवसांत सादर करण्यास प्रशासकांनी सांगितले आहे. अन्यथा, संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा दमही भरला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.