Sharad Pawar : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावरून देशात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. अशातच इंडिया आघाडीकडून भाजप आणि भाजप मित्रपक्षांवर निशाणा साधला जात आहे. राम मंदिर पूर्ण झाल्याच्या आनंदात अनेक हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून अनेक कठोर परिक्रमा, उपवास, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 11 दिवस कठोर उपवास करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदींवर तोफ डागली आहे. त्याचबरोबर राम मंदिर आणि राजीव गांधी यांचे कनेक्शन शरद पवार यांनी सांगितले आहे. शरद पवार हे आपल्या दौऱ्यानिमित्त कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे आले होते. निपाणीतील राष्ट्रवादीचे नेते उत्तम पाटील यांच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बाबरी मशीद पाडल्यानंतर येथे राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्यावेळी झाला होता. राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला होता. पण राम मंदिराचे काम राहिले बाजूला, आता भाजप आणि आरएसएस याचा मतासाठी फायदा करून घेत आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो. पण गरिबी घालवण्यासाठीदेखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का ? असा सवाल करीत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान राम मंदिरासाठी 11 दिवस कठोर उपवास करीत आहेत. तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा, असा टोला पवार यांनी लगावला. मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले होते. पण आजदेखील शेतकरी कर्जात आहे. या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्जे माफ होतात, पण शेतकऱ्यांची कर्जे माफ होत नाहीत.
देशात चुकीची आर्थिक धोरणं राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरण घेणाऱ्या लोकांना बाजूला केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली. कर्नाटक राज्यातील निकाल विरोधकांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. पण सध्या धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. अयोध्येचा जय श्रीराम, हनुमान यांबद्दल आम्हाला आदर असल्याचे पवार यांनी सांगितले.
(Edited by Amol Sutar)
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.