Sonali Andekar_Lakshmi Andekar_Kalyani Komkar 
पुणे

Andekar Vs Komkar: आंदेकरांच्या कुटुंबाला राष्ट्रवादीने तिकीट देताच कोमकरही रिंगणात! नाना पेठेत दोन्ही गँग पुन्हा भिडणार

Andekar Vs Komkar: आंदेकर आणि कोमकर या एकमेकांचे जवळचे नातलग अन् गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

Amit Ujagare

PMC Election Andekar Vs Komkar: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं गुंड आंदेकरांना एबी फॉर्म दिला असून या कुटुंबातील दोन जणांची उमेदवारी निश्चित झाली आहे. पण यामुळं आणखी एक खळबळजनक उमेदवारी जाहीर झाली आहे. आंदेकर टोळीनं हत्या केलेल्या आयुष कोमकरच्या आईनं म्हणजेच कल्याणी कोमकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवारांनी आंदेकर कुटुंबाला उमेदवारी देऊ नये अशी विनंती कल्याणी कोमकर यांनी केली होती, पण तरीही उमेदवारी जाहीर झाल्यानं आता त्यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ-नाना पेठ) इथून कल्याणी कोमकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर गुंड बंडू आंदेकर याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक २३ मधूनच उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षानं या दोघींना एबी फॉर्म देखील दिला असून त्यांनी आपला अर्जही दाखल केला आहे. कल्याणी कोमकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडं उमेदवारी मागितली होती. आंदेकर कुटुंबाची दहशत मोडून काढण्यासाठी तसंच आपल्या मुलाला आयुष कोमकरला न्याय मिळवून देण्यासाठी आपण राजकारण उतरणार असल्याचं कल्याणी कोमकर यांनी सुरुवातीला म्हटलं होतं. पण शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळं अखेर अपक्ष म्हणून कल्याणी कोमकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कल्याणी कोमकर यांनी यापूर्वी म्हटलं होतं की, "बंडु आंदेकर आणि त्याच्या टोळीनं अनेक जणांची घरं उद्ध्वस्त केली आहेत. कोर्टानं देखील या गुन्हेगार कुटुंबातील लोकांना उमेदवारी देण्यास परवानगी द्यायला नको होती. पण अजित पवार यांच्याकडं आपण विनंती करणार आहोत की त्यांनी आंदेकर कुटुंबाला उमेदवारी देऊ नये" आंदेकर टोळीनं विजय निंबाळकर, निखिल आखाडे, आयुष कोमकर आणि गणेश काळे यांचाही खून केला आहे, असंही कल्याणी कोमकर यांनी म्हटलं आहे.

आंदेकर-कोमकर टोळीचा संघर्ष

बंडू आंदेकर हा पुण्यातील नाना पेठ भागात राहणारा कुख्यात गुंड आहे. त्याचा मुलगा वनराज आंदेकर हा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक होता. गेल्याच वर्षी त्याची नाना पेठेतच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर वनराजचा सख्खा भाचा अर्थात बहिण कल्याणी कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर या १९ वर्षीय मुलाला आंदेकर टोळीच्या लोकांनी गोळ्या घालून ठार केलं होतं. तीन महिन्यांपूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये पुण्यात भरदिवसा हे हत्याकांड घडलं होतं. पोलिसांना या हत्येची खबर मिळूनही त्यांना हे हत्याकांड रोखण्यात अपयश आलं होतं.

दरम्यान, वनराज आंदेकरचा खून आयुष कोमकरचे वडील गणेश कोमकर यानंच घडवून आणल्याच्या संशयातून वनराजच्या खूनाचा सूड घेण्यासाठी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरला संपवण्याचा कट आंदेकर टोळीनं रचला होता. हा कट कुख्यात बंडू आंदेकर यानंच रचला होता म्हणजेच त्यानं आपला नातू असलेल्या (मुलीचा मुलगा) आयुष कोमकरचा खून घडवून आणला असल्याचा आरोप आहे. याच आरोपांखाली आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडु आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्यासह १५ जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली होती.

नाना पेठेत राजकीय टोळी युद्ध

एकूणच आंदेकर आणि कोमकर या दोन्ही गुन्हेगार टोळ्यांतील लोकांनी प्रभाग क्रमांक २३ नाना पेठ इथूनच अर्ज दाखल केल्यानं आता निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय टोळी युद्ध या प्रभागात पाहायला मिळणार आहे. पण यातून कोण कोणावर मात करतो अर्थात कोण निवडून येतो याकडंही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT