Pune: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुमारे १९ वर्षानंतर होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नवी मुंबईनंतर सर्वात मोठी बाजार समिती म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिलं जाते.
मात्र, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या(Pune Market Committee Election News) निवडणुकीतील विकास सोसायटी मतदारसंघ गटातून बाजार समितीचे तत्कालीन तीन माजी सभापती आणि एका संचालकांनी भरलेले उमेदवारी अर्ज मंजूर करण्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या आदेशास पणन संचालकांकडे आव्हान देण्यात आले आहे.
पणन संचालकांसमोर यावर सोमवारी (दि.१७) दुपारी सुनावणी पार पडली आहे. बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्याकडे चंद्रकांत गोविंद वारघडे (बकोरी, ता. हवेली) यांनी बाजार समितीचे माजी सभापती व निवडणुकीतील उमेदवार दिलीप काळभोर (लोणी काळभोर), प्रकाश जगताप (जगताप वस्ती, आष्टारपूर), रोहिदास उंद्रे (मांजरी खुर्द) आणि माजी संचालक राजाराम कांचन (उरुळी कांचन) यांचे दाखल उमेदवारी अर्ज अपात्र करण्यासाठी अपील करण्यात आले आहे. आता याप्रकरणी पणन संचालकांकडून आज निर्णय येण्याची शक्यता आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील चार उमेदवारांच्या अर्ज मंजुरीविरोधात पणन संचालकांकडे दाखल अपिलावर सुनावणी झाली आहे. त्यावर मंगळवारी सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे.,संबंधित उमेदवारांबाबत पणन संचालक नेमका काय आदेश देणार? याकडे संपूर्ण बाजार वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उमेदवार व सभापती यांचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत.त्याविरोधात पणन संचालकांकडे अपील दाखल केले आहे.त्याद्वारे त्यांनी बाजार समितीच्या तत्कालीन बरखास्त संचालक मंडळातील सदस्यांना सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत अपात्र करण्याची मागणी केली आहे.त्यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे.
...यावर पणनकडे अपील दाखल
पुणे बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाचे 1 ऑक्टोबर 1999 ते 19 ऑगस्ट 2002 या कार्य कालावधीतील कामकाजाची चौकशी करण्यासाठी पणन संचालकांनी मे. मुलाणी आणि कंपनीची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या चौकशी अहवालानुसार त्या कालावधीत 8 कोटी 66 लाख 50 हजार इतक्या रकमेचा आर्थिक तोटा झाला. त्या आर्थिक तोट्याला 21 संचालक जबाबदार होते. ही रक्कम विभागल्यास प्रत्येक संचालकानुसार 41 लाख 26 हजार 190 रुपयांच्या रकमेस ते जबाबदार होते आणि अहवाल अस्तित्वात असल्याने बाजार समिती कायद्यानुसार ते अपात्र ठरतात.
निवडणूक निर्णय अधिकारी काय म्हणाले?
निवडणूक(Election) निर्णय अधिकार्यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्हा उपनिबंधकांनी 8 मार्च 2022 रोजीच्या कायद्यान्वये संबंधित संचालकांना नोटीस काढल्या. त्यास पणनमंत्र्यांकडे अपिल क्रमांक 10/2023 दाखल केले असता त्यांनी 8 मार्च 2022 रोजीच्या नोटीसविरुध्द पुढील सुनावणी होईपर्यंत अंतरीम स्थगिती आदेश पारित केले आहेत व या प्रकरणी पुढील सुनावणी 12 एप्रिल 2023 रोजी ठेवण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज 5 एप्रिलच्या आदेशान्वये मंजूर केलेले आहेत.
...म्हणून वादाला सुरुवात!
राज्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मात्र, राज्य सरकारने परिपत्रक काढताना मुळशी बाजार समितीच्या हद्दीतील असलेल्या ताथवडेसह सात गावांचा समावेश पुणे बाजार समितीत केल्याने वादाला सुरुवात झाली. त्यातून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मुळशीतील सात गावे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत घेण्याला याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.
एकूण १८ संचालकांची निवड होणार
या निवडणुकीत एकुण १८ संचालकांची निवड होणार आहे. यातील ११ जागा सोसायटी गटातून, चार जागा ग्रामपंचायत गटातून, दोन जागा व्यापारी गटातून तर एक जागा हमाल, तोलणार गटातून निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीसाठी साडेसतरा हजार मतदार आहेत. चारशे मतदारांसाठी एक मतदान(Voting) केंद्र अशी रचना करण्यात येणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.