Murlidhar Mohol And Medha Kulkarni Sarkarnama
पुणे

Pune Loksabha News: मोहोळांच्या प्रचाराचा 'श्रीगणेशा'; पण खासदार कुलकर्णींचा दिल्लीत भेटीगाठींचा धडाका

Murlidhar Mohol And Medha Kulkarni : पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांच्यात राजकीय वर्चस्वातून मतभेद असल्याचे लपून राहिलेले नाही. विधानसभा 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून या दोघांमधील सुप्त राजकीय संघर्ष टोकदार होत गेला.

Sachin Waghmare

Pune Loksabha News :पुण्यातून भारतीय जनता पक्षाने माजी महापौर मुरलीधर मोहोळांना उमेदवारी देऊन त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतरच्या काही तासांतच, ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. भाजपसह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार)नेत्यांना घेऊन मोहोळांनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा 'श्रीगणेशा' केला. उमेदवारी जाहीर झाल्यापासून पुण्यातील भाजपमधील बहुतांशी नेते मोहोळांसोबत प्रचारात उतरत असतानाच, दुसरीकडे भाजपच्याच नव्या खासदार मेधा कुलकर्णी मात्र, दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याचे दिसून आले.

अर्थात, दिल्लीतील भेटींचा कार्यक्रम नियोजित असल्याचे मेधा कुलकर्णी सांगतील; प्रत्यक्षात मात्र त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामागे मोहोळांसोबतच्या मतभेदाचेही कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यसभेतील खासदारकी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत गेलेल्या मेधा कुलकर्णींनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडेंची सदिच्छा भेट घेतल्याचे त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिसत आहे.

पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांच्यात राजकीय वर्चस्वातून मतभेद असल्याचे लपून राहिलेले नाही. विधानसभा 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून या दोघांमधील सुप्त राजकीय संघर्ष टोकदार होत गेला. त्यानंतर पक्षाच्या काही कार्यक्रमांतील निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याच्या घटनेवरून मेधा कुलकर्णी स्वपक्षातील नेत्यांवर नाराज होत्या. विशेषतः उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्यावर आगपाखड केली होती. त्यावरून मेधा कुलकर्णींच्या मनातील खदखद उघड झाली होती.

त्यानंतर भाजपने मेधा कुलकर्णींची नाराजी दूर करत त्यांची नियुक्ती राज्यसभेवर केली. तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना लोकसभेची उमेदवारी दिली. भाजपने दोघांना समान संधी दिली आहे. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी झाले गेले विसरून आता मोहोळ यांच्या लोकसभा प्रचारात सहभागी व्हायला हवे होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन गुरुवारी मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धडाक्यात सुरुवात केली. या वेळी महायुतीचे सगळे नेते उपस्थित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (ChandraShekhar Bawankule) यांच्यासह पुणे शहरातील सर्व आमदार व दिग्गज मंडळींनी हजेरी लावली.या वेळी सर्वांनी मिळून विजयाचा निर्धार बोलून दाखवला.

त्यावेळी खासदार मेधा कुलकर्णी या दिल्लीत होत्या. त्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत. मात्र, मेधा कुलकर्णी यांनी दिल्ली दौरा नियोजित असल्याचे सांगत मेधा कुलकर्णीनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडेंची सदिच्छा भेट घेतल्याचे त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिसत आहे.

मुरलीधर मोहोळ व मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यातील वाद सर्वश्रुतच आहे. दोघेपण २०१४ मध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. दोघांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. ऐनवेळी पक्षाने मेधा कुलकर्णींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यानंतर त्या निवडूनही आल्या. त्यानंतर मोहोळ व कुलकर्णी यांच्यातील वाद वाढतच गेला. कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्यातील दरी वाढत गेली.

त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी परत दोघेही कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यावेळेस पक्षाने दोघांना उमेदवारी न देता चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यानंतर मोहोळ यांना महापौरपद देत समजूत काढली होती, तर मेधा कुलकर्णी यांना कुठलीच संधी न मिळाल्याने त्या नाराज होत्या. त्यानंतर या दोघांतला वाद आजतागायत कायम राहिला आहे.

मेधा कुलकर्णी खासदार झाल्यानंतर मोहोळ व त्यांच्यातील वादावर पडदा पडले असे वाटत असताना आठ दिवसापूर्वी कोथरूड येथील थोरात उद्यानातील प्रस्तावित मोनोरेल प्रकल्पावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी नागरिकांना पाठिंबा दर्शवित या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे, तर माजी महापौर मुरलीधर मोहोळ या प्रकल्पासाठी आग्रही असल्याचे चित्र दिसले.

कोथरूड येथील थोरात उद्यानात खुली व्यायामशाळा, योग केंद्र, विरंगुळा केंद्र, वाॅकिंग ट्रॅक, डायनासोर पार्क यासाठी बांधकाम केल्यानंतर आता प्रस्तावित मोनो रेल प्रकल्पासाठी उद्यानात मोठ्या प्रमाणावर खांब उभारण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पासाठी उद्यानात बांधकाम करण्यात येणार असल्याने मोनो रेलला उद्यानप्रेमींकडून विरोध सुरू झाला आहे.

या प्रकल्पाविरोधात नागरिकांनी कृती समिती स्थापन केली असून प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी कृती समितीने लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. त्याला उपस्थित राहात कुलकर्णी यांनी नागरिकांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला आहे. या निम्मिताने मोहोळ व मेधा कुलकर्णी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

आगामी काळात होणारी पुणे लोकसभेची निवडणूक भाजपच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जात आहे. भाजपने या निवडणुकीत चारशे जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत गटबाजीवरून होणारा वाद भाजपला न परवडणारा आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वांनीच पक्षातील गट-तट व अंतर्गत मतभेद विसरून मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी संघटनात्मक काम करण्याची गरज आहे. दुसरीकडे मोहोळ व मेधा कुलकर्णी यांनी येत्या काळात त्यांच्यातील वाद वाढविण्याऐवजी यावर सामोपचाराने एकत्र येत पक्षाने दोघांना दिलेली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT