Vilas Lande, Amol Kolhe, Shivajirao Adhalrao sarkarnama
पुणे

Shirur Loksabha News : कोल्हेंविरोधात शिरूरच्या मैदानात महायुतीकडून कोण उतरणार...?

Umesh Bambare-Patil

Shirur Political News : सध्या शिरूर मतदारसंघावरून महायुतीतील घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव हे जरी इच्छुक असले तरी या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने दावा केलेला आहे. उमेदवारांची अदलाबदल करण्यास अजितदादा गटाचा विरोध आहे. त्यामुळे बैठकावर बैठका होऊनही महायुतीकडून कोल्हेंविरोधातील उमेदवार ठरता ठरेना झाला आहे.

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी हा मतदारसंघ युतीच्या वाटणीत आपल्याकडे घेऊन तेथून ते उमेदवार देणार होते, पण कोल्हेंविरोधात उमेदवारच ठरेना, त्यामुळे अजित पवारांची अडचण झाली आहे.

मागील निवडणुकीत कोल्हेंकडून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे यावेळेसही पुन्हा शिरूरमधून इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शिवाजीराव आढळराव यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी देण्याचा प्रयत्न होणार होता.

पण त्यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीकडूनच विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे आढळरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश सध्यातरी लांबणीवर पडला आहे. त्यामुळे याची संधी साधून राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी आता या मतदारसंघात फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी ते मुंबईत ठाण मांडून बसले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरूर मतदारसंघातून आता शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे विलास लांडे (Vilas Lande) हे दोघे दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. दोघांनीही आपापल्या नेत्याकडे फिल्डिंग लावली आहे. यामध्ये कोण आपल्या नेत्याला गळ घालून उमेदवारी पदरात पडून घेण्यात यशस्वी होणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंविरोधात (Amol Kolhe) महायुतीचा उमेदवार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT