Shivajirao Adhalrao Patil  Sarkarnama
पुणे

Shivajirao Adhalrao Patil : राजगुरुनगरमधील जनसन्मान यात्रेला शिवाजीराव आढळरावांची दांडी; राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा!

NCP Jansanman Yatra : या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह आमदार दिलीप मोहिते, स्थानिक नेते उपस्थित होते. मात्र, शिरूरमधून लोकसभेची निवडणूक लढवलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मात्र गैरहजर होते.

Vijaykumar Dudhale

Pune, 17 August : राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होमपीच असलेल्या पुणे जिल्ह्यात सध्या ही यात्रा आहे. यात्रेला विशेषतः महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पक्षातील रुसवे फुगवेही पुढे येत आहेत.

खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे आज जनसन्मान यात्रेनिमित्त ( Jansanman Yatra) सभेचे आयोजन केले होते. राजगुरुनगर येथील जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली, त्यामुळे आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात जनसमान यात्रेचे आयोजन केले आहे. सध्या ही यात्रा पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे. राजगुरुनगर येथे आज (ता. 17 ऑगस्ट) सकाळी जनसन्मान यात्रेनिमित्त सभेचे आयोजन केले होते.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह आमदार दिलीप मोहिते, स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होते. मात्र, शिरूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मात्र गैरहजर होते, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत रंगली होती.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीत आलेल्या आढळराव पाटील यांचे मन पक्षात रमत नसल्याची चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार आपल्याला विचारात घेत नाहीत, अशी खंतही काही दिवसांपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली होती, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आढळराव पाटील हे नाराज आहेत का, अशी चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली आहे.

दरम्यान, ज्या मतदारसंघात जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम होता, त्या मतदारसंघातील आमदार दिलीप मोहिते आणि आढळराव पाटील यांच्यातील सख्य सर्वांना माहिती आहे. आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला आमदार मोहिते यांनी विरोध दर्शविला होता. मात्र, अजित पवार यांच्या भेटीनंतर मोहिते यांनी आढळराव पाटील यांचे काम केले होते. तीही किनार आढळरावांच्या अनुपस्थितीला असू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT