महायुतीतील स्थानिक फूट – राज्यात भाजप–शिवसेना–राष्ट्रवादीची महायुती असली तरी मावळ तालुक्यात स्थानिक निवडणुकीत ही आघाडी लागू होणार नाही.
शेळके–भेगडे थेट सामना – राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांत थेट लढत होणार आहे.
भाजप प्रवेशाने समीकरण बदलले – काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही नेते भाजपमध्ये दाखल झाल्याने भेगडे गट मजबूत झाला; मात्र अजित पवार समर्थक बबनराव भेगडे राष्ट्रवादीत ठाम राहिले आहेत.
Pune, 18 September : राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची महायुती सत्तेत आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मावळ तालुक्यात मात्र महायुतीचे गणित लागू होणार नाही, हे निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमने सामने येणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत (Local Body Election) राज्यातील सत्ताधारी पक्ष महायुती म्हणूनच लढणार असल्याचे वरिष्ठ नेते वारंवार सांगत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर कार्यकर्ते वेगळीच भाषा बोलत आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा थेट लढती होण्याची शक्यता आहे.
महायुतीचे नेते राज्य पातळीवरून एकत्रित लढण्याची भाषा बोलत असले तरी स्थानिक पातळीवर महायुती होण्याची शक्यता धूसर असल्याचे दिसून येत आहे. तोच प्रकार मावळ (Maval) मतदारसंघातही होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती असूनही मावळ मतदारसंघात युती झाली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार सुनील शेळके यांनाच उमेदवारी दिली होती, तर भाजपसह इतर सर्वपक्षीय नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेच बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला होता. सर्व विरोधक एकत्र असूनही सुनील शेळके हे तब्बल ८० हजार मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर शेळके–भेगडे यांच्यातील राजकीय संघर्षाला सुरुवात झाली.
भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे आणि रवींद्र भेगडे यांच्या पुढाकाराने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब भेगडे यांचे समर्थक भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे संघर्षाला नवा रंग चढला आहे. मात्र, दुसरीकडे अजित पवारांचे विश्वासू नेते बबनराव भेगडे यांनी ‘आम्ही अजित पवारांसोबतच राहणार’ अशी भूमिका स्पष्ट करून अनेक गावपातळीवरील पदाधिकारी, माजी सरपंच आणि कार्यकर्त्यांना आपल्यासोबत ठाम उभे केले.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये सुनील शेळके यांच्या पराभवासाठी सर्व विरोधक एकत्र आले होते, तरीही त्यांचा पराभव शक्य झाला नाही. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माजी मंत्री बाळा भेगडे यांनी भाजपत नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारीची आश्वासने दिली आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोणावळा व तळेगाव नगरपरिषद तसेच वडगाव नगरपंचायत या निवडणुकांत थेट शेळके विरुद्ध भेगडे असा सामना रंगणार आहे.
प्र.1: मावळ तालुक्यात महायुती एकत्र लढणार का?
उ. – नाही, स्थानिक निवडणुकीत महायुतीचे एकत्रित गणित लागू होत नाही.
प्र.2: प्रमुख प्रतिस्पर्धी कोण आहेत?
उ. – राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे.
प्र.3: कोणत्या निवडणुकांत हा सामना अपेक्षित आहे?
उ. – पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोणावळा व तळेगाव नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत निवडणुकीत.
प्र.4: भाजपमध्ये नव्या प्रवेशाचा काय परिणाम झाला?
उ. – काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही नेते भाजपमध्ये गेल्याने भेगडे गट अधिक बळकट झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.