vasant more sharmila thackeray sainath babar sarkarnama news
पुणे

Vasant More : "कुणासाठी कितीही करा, वेळ आली की...", वसंत मोरेंचा स्टेटसमधून सूचक इशारा

Vasant More On Loksabha Election : वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पण...

Sudesh Mitkar

देशात लोकसभा निवडणुकीचे ( Loksabha Election 2024 ) वारे वाहायला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत, तर मनसेतंही इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. पुण्यातून मनसे नेते, वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी "साईनाथ बाबर दिल्लीत गेले, तर दुधात साखर पडेल," असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वसंत मोरेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. अशातच मोरेंनी ठेवलेलं स्टेटस चर्चेत आलं आहे.

वसंत मोरे ( Vasant More ) यांनी पुण्यात बॅनरबाजी करून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं यापूर्वीच दाखवून दिलं होतं. अशातच मंगळवारी पुण्यातील कोंढव्यात एका कार्यक्रमास शर्मिला ठाकरे ( Sharmila Thackeray ) उपस्थित होत्या. त्यावेळी "साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पाहायचं आहे. त्यांना महापालिकेत पाठवायचं नाही. दिल्लीत पाठवलं, तर दुधात साखर पडेल," असं विधान शर्मिला ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळे साईनाथ बाबर ( Sainath Babar ) यांच्या लोकसभेचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर वसंत मोरेंनी व्हॉट्सअ‍ॅपवर एक सूचक स्टेटस ठेवलं आहे. "कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच. पण, मी पट्टीचा गारुडी आहे. योग्यवेळी सगळी गाणी वाजणार," असा सूचक इशारा स्टेटसमधून वसंत मोरेंनी दिला आहे. त्यामुळे वसंत मोरेंचा रोख नेमका कोणाकडं आहे, असा सवाल उपस्थित होतोय.

मागील महापालिका निवडणुकीत पुण्यातून मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यात एक वसंत मोरे आणि दुसरे साईनाथ बाबर... त्यामुळे हो दोन्ही नेते वारंवार एकत्र दिसतात. बाबर आणि मोरे यांच्या मैत्रीची चर्चा पुण्यातील राजकारणात आणि पालिका वर्तुळात नेहमी होत असे. पण, काही राजकीय घडामोडींमुळे मोरेंना शहराध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं.

शहराध्यक्षपदाची माळ साईनाथ बाबर यांच्या गळ्यात पडली. या निवडीनंतर मोरे आणि बाबर यांच्यात घुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे गेल्या काही कालावधींपासून दोन्ही नेते एकत्र दिसत नाहीत.

दरम्यान, मोरेंनी लोकसभा मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्तानं 'जनता दरबार' असो की शहरभर 'पुण्याची पसंत मोरे वसंत' अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. एकीकडं मोरेंची तयारी सुरू असताना दुसरीकडे शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यानं मोरेंचा पत्ता कट झाला का? अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे मोरेंच्या स्टेटसनं मनसेत 'कोल्ड वॉर' रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT