Vasant More Sarkarnama
पुणे

Vasant More News : वसंत मोरे यांची सोशल मीडियावर क्रेज! मात्र राजकीय पक्षांना झालेत नकोसे

Sudesh Mitkar

Pune News : सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पोचलेले मनसेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी पक्षाला राम राम केला आहे. आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत चर्चा सुरू आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्याला संपर्क करून प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले असल्याचे वसंत मोरे सांगत आहेत. मात्र, त्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी वरिष्ठ नेते जरी इच्छुक असले तरी शहरातील बहुतांश पक्षातील पदाधिकारी मात्र तितकेसे सकारात्मक नसल्याचं बोललं जात आहे.

बहुतांश वेळा नेते एखाद्या पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वीच दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित करत असतात. त्यामुळे पक्ष प्रवेश ठरल्यानंतर राजीनामा दिला जातो. वसंत मोरे यांनी मात्र कोणत्याही पक्षाची प्रवेशासाठीची निश्चिती न घेताच तडकाफडकी राजीनामा दिला आहे आणि आता लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) आचारसंहिता लागण्यास काही तास राहिले असताना पक्ष प्रवेशासाठी चाचपणी करत आहेत.

यासाठी त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, तर काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या भेटीसाठी वसंत मोरे यांनी मुंबई वारी केल्याचं पाहायला मिळालं. वसंत मोरे (Vasant More) यांना आगामी लोकसभेची निवडणूक लढायची आहे. मात्र, सध्या तरी महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत.

तर दुसरीकडे त्यांची कार्यपद्धती आणि पक्ष प्रवेशानंतर बदलणारी विधानसभेच्या उमेदवारीबाबतची गणिते यामुळे बहुतांश पक्षातील पदाधिकारी त्यांना पक्षामध्ये घेण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. उघड उघड हे नेते बोलायला तयार नसले तरी आपल्या भावना ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवत असल्याचं पुढं आलं आहे.

वसंत मोरे यांनी गुरुवारी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे असणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष मोरेंनी लोकसभेची इच्छा पूर्ण करू शकत नाही. विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर मागील निवडणुकीमध्ये मोरे हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते सध्या त्या ठिकाणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे इच्छुक आहेत.

त्यामुळे वसंत मोरे यांचं येणं त्यांना अडचणीचे ठरू शकतं, तर दुसरीकडे खडकवासला मतदारसंघाचा विचार केला तर मागील निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले सचिन दोडके आणि विशाल तांबे यांच्याकडून विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे मोरे यांच्या येण्याने विधानसभेच्या गणितांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करता पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रम आहे.

काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी यांनी वसंत मोरे यांची भेट घेऊन त्यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली असली तरी लोकसभेबाबत कोणतीही वाच्यता केली नाही. जोशी यांनी इच्छा प्रदर्शित केली असली तरी काँग्रेस (Congress) मधील इतर गट मात्र मोरे यांच्या प्रवेशाबाबत तितकेचे सकारात्मक दिसत नाहीत. मोरे यांची खळखट्याकची विचारसरणी पक्ष धोरणांमध्ये बसत नसून भविष्यात वसंत मोरे यांचे खळखट्याक पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात जाऊ शकते, असं काँग्रेसमधील काही स्थानिक नेत्यांचे मत आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा विचार केला. येथील स्थानिक नेत्यांनी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहेत तिथेही सकारात्मकता दिसत नाही. महायुतीचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रूपाली पाटील यांना सोडून कोणत्याही नेत्यांनी वसंत मोरे यांना पक्ष प्रवेशाबाबत ऑफर दिल्याच्या समोर आलेले नाही. तसेच भाजपचे सध्याचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मित्रत्वाच्या नात्याने फोन केला असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

तो संपर्क वगळता इतर कोणताही संपर्क भाजपकडून वसंत मोरे यांना झाल्याचं पाहिला मिळाला नाही. त्यामुळे अध्याप तरी वसंत मोरे यांच्या पक्ष प्रवेशाचं अधांतरीच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढण्याचा चंग बांधलेले वसंत मोरे अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT