MVA - Mahayuti Sarkarnama
विशेष

Vidhansabha Election Exit Poll : एक्झिट पोलनुसार मुंबईवर वर्चस्व महायुती की महाविकास आघाडीचे ? काय सांगतात आकडे...

Mumbai dominance Mahayuti vs Mahavikas Aghadi: मुंबईतील 36 जागा पैकी किती जागा कॊणाच्या वाट्याला येणार ? महायुतीला यश मिळणार की महाविकास आघाडीचं वर्चस्व राहणार? याची आकडेवारीच पुढे आली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दोन महिन्यापासून सुरु होती. राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत झाली. तर दुसरीकडे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीची भूमिका देखील निवडणुकीत महत्वाची ठरली. त्यामध्ये मुंबईतील 36 जागा पैकी किती जागा कॊणाच्या वाट्याला येणार ? महायुतीला यश मिळणार की महाविकास आघाडीचं वर्चस्व राहणार? याची आकडेवारीच पुढे आली आहे.

मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. सत्ता काबीज करण्यासाठी या 36 जागांवरील कल निर्णायक ठरणार असल्याने या ठिकाणी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच पाहावयास मिळाली. या ठिकाणी विविध मुद्द्यांवर निवडणूक लढवली जात असली तरी प्रत्येक मतदारसंघातील प्रश्न वेगवेगळे आहेत.

त्याशिवाय त्या भागातील जातीय समीकरणे वेगवेगळी असल्याने त्या सर्व बाबीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. यावेळेला मनसेनेही मुंबईत मोठ्या संख्येने उमेदवार दिल्याने भाजप (Bjp), दोन शिवसेना आणि मनसे यांच्यातील रणसंग्राम अनुभवण्यास मिळाला. मुंबईतील बहुतांश मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पहायला मिळाली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहापैकी चार जागी महाविकास आघाडीने विजय मिळवला होता. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 3 जागा तर काँग्रेसला एक जागी विजय मिळवला होता. तर महायुतीला दोन जागी यश मिळाले होते. त्या पैकी एक ठिकाणी भाजपला तर एक ठिकणी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचा उमेदवार अवघ्या 48 मताने निवडून आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत याठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली होती.

लोकसभा निवडणुकीवेळी चित्र थोडेसे वेगळे होते. त्यावेळी मनसे निवडणूक रिंगणात नव्हती. त्यामुळे मराठी मताची मोठ्या प्रमाणात मत विभागणी झाली नव्हती. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसे निवडणूक रिंगणात उतरली नाही. त्यामुळे काही मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे मराठी मतामध्ये मतविभागणी झाली. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी मते कोणाच्या पारड्यात पडणार यावर याठिकाणचे यश-अपयश अवलंबून असणार आहे.

मुंबईत मनसेसोबतच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सर्वच मतदारानी महाविकास आघाडी अथवा महायुती या दोन मोठ्या पक्षाच्या पारड्यात मते टाकली होती. त्यामुळे या छोट्या पक्षाचा प्रभाव लोकसभा निवडणुकित जाणवला नव्हता.

विशेषतः मुंबईतील मुस्लिम व दलित व्होटबँक महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिले असल्याचे चित्र होते. मात्र, यावेळेस एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमुळे मत विभागणी झाली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची व्होट बँक बदलली आहे. शिवसैनिकासोबतच या ठिकाणी मुस्लिमबहुल भागात मतदान ही होताना दिसत आहे. त्यामुळे याचा ठाकरे गटाला फायदा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती बॅकफूटला गेली असल्याचे चित्र पहायवास मिळत होते. मात्र, त्यानंतर महायुतीने कमबॅक केले आहे. विशेषतः गेल्या काही दिवसात महायुतीने प्रचारातही मोठी आघाडी घेतलेली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून महायुती थोडीशी सावरली आहे.

विशेषता त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शेतकरी, महिला, युवकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान भरून काढण्याचे ठरवले होते. त्यामध्ये लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी उपयुक्त ठरल्याचे दिसत आहे.

मुंबईतील पारंपरिक मतदारसंघात माहीम, वरळी, कुर्ला, दिंडोशी, वांद्रे पूर्व, शिवडी विधानसभा मतदारसंघात मराठी मताची विभागणी मनसे व महाविकास आघाडीत होणार आहे. तर दुसरीकडे मुस्लिम व दलित मते आघाडीच्या बाजूने जाणार आहेत. एक्झिट पोलनुसार मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांवरील कल निर्णायक ठरणार आहे. एक्झिट पोलनुसार मुंबईवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे वर्चस्व असणार आहे.

या ठिकाणच्या 36 जागांपैकी 15 ते 20 जागा आघाडीच्या पदरात पडतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये 10 ते 15 जागा या ठाकरे गटाच्या पारड्यात पडतील, असे चित्र आहे. दुसरीकडे महायुतीला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता असून यामध्ये 10 ते 12 जागा भाजपला मिळतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे आता निवडणूक निकालाकडे लक्ष असणार आहे.

मुंबईतील स्पर्धा निश्चितच तुल्यबळ असणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळेस मतदाराचा कल एका बाजूने दिसत नाही. तर मतदाराचा कल या निवडणुकीत दोन्हीकडून झुकलेला दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार ? हे पाहण्यासाठी 23 नोव्हेंबरची म्हणजेच मतमोजणीची वाट पहावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT