Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामतीजवळील विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजित पवार हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहावेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे एकमेव नेते होते. अजितदादांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केली होती. सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असला, तरी राज्याचे सर्वोच्च पद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही. तीन वेळा त्यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे त्यांचे ते स्वप्न अधुरेच राहिले.
अजित पवार (Ajit Pawar) यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर विरोधकांना धडकी भरणारी अशीच होती. प्रशासनावरील जबरदस्त पकड आणि सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दादांनी एक दोनदा नाही तर सहावेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले. अजित पवार यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरील निवडीने झाली. 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1999 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी सातत्याने विजय मिळवला. बारामती हा त्यांचा अभेद्य किल्ला होता.
राज्यच्या मंत्रीमंडळात अजित पवार यांनी विविध खात्याचा पदभार भूषवला. त्यांनी जलसंपदा, कृषी, ग्रामविकास, नियोजन, ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांनी विक्रमी सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, सिंचन प्रकल्पांची गतीमानता, ग्रामीण रस्ते विकास अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या. प्रशासकीय कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.
2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अचानक राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी केंद्रातून पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) सरकारमधील नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते. मात्र, त्यानंतर अजित पवार यांचे नाव पुढे आले. 10 नोव्हेंबर 2010 रोजी अजित पवार यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून राजभवनावर शपथ घेतली.
2012 ते 2014 मध्ये अजितदादा यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी तिसऱ्यांदा ते 80 तास राज्याचे उपमुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर लगेचच डिसेंबर 2019 ते 2022 मध्ये राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार आले, त्यावेळी चौथ्यावेळी राज्याचे ते उपमुख्यमंत्री झाले.
त्यांनतर जुलै 2023-2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार पाचव्यावेळी उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेत आले. त्यावेळी 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहाव्यावेळी ते उपमुख्यमंत्री झाले होते.
तीनवेळा हुकली मुख्यमंत्रीपदाची संधी
2004 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसला कमी जागा मिळाल्या होत्या. त्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्यांदा मुख्यमंत्री होईल, असे वाटत होते. त्यावेळी संधी चालून आली होती. त्यावेळी अजितदादा मुख्यमंत्री होतील, असे सर्वाना वाटत होते. त्यांना मुख्यमंत्री करावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला आणि दादांची त्यावेळी मुख्यमंत्री होण्याची पहिली संधी हुकली.
त्यानंतर 2019 साली शिवसेनेने भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी करून दादांनी मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने सर्वात मोठे धाडस केले होते. पण अवघ्या 80 तासांत ते सरकार कोसळले आणि दादांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे त्यावेळेसच्या तडजोडीतही दादांना मुख्यमंत्रिपद मागितल्यानंतर मिळाले असते. त्यावेळी दुसऱ्यांदा त्यांची संधी हुकली होती.
2022 साली शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेना व भाजपचे सरकार आले त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजितदादा महायुतीसोबत गेले. त्यावेळी अजितदादा मुख्यमंत्री होणार अशा चर्चांनी जोर धरला होता, मात्र एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिल्याने दादांचे तिसऱ्यांदा स्वप्न अधुरे राहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.